हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी महामंडळाने प्रवासाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता एसटीच्या प्रवासाबाबत तसेच सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल, तर प्रवासाच्या तक्रारीचे निराकरण आता लगेच होणार आहे. यासाठी आता बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थापन प्रमुखाचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. म्हणजे प्रवास करताना जर प्रवासासंबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यांना लगेच तक्रार करता येईल.
एसटीचा प्रवास करताना अनेक समस्यांचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो. परंतु या तक्रारी कुठे करायची? यासाठी कोण मदत करेल?असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आता या संदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. यामुळे आता प्रवाशांना ज्या काही समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी एसटीची सेवा सुधारण्यासाठी एसटी बसमध्ये आगार व्यवस्थापकांनी दूरध्वनी क्रमांक एसटी बसच्या प्रदर्शनीय भागात लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यामध्ये तुम्ही एसटी चालक जर वेगाने एसटी चालवत आहे का? एसटी चालवताना मोबाईल पाहत आहे का? प्रवाशांना सुट्टे पैसे परत केले की नाही? वाहकांशी असणारे वर्तवणूक कसे आहे? योग्य बस स्टॉपवर बस थांबली आहे की नाही! बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे की नाही? अशा तक्रारी तुम्ही आता मुख्यालयाकडे करू शकता. यासाठी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस दूरध्वनी क्रमांक लावण्याचे आदेश महामंडळाने प्रत्येक आगाराला दिलेले आहे.
त्याचप्रमाणे येत्या 21 सप्टेंबरपर्यंत एसटी बसमध्ये दूरध्वनी क्रमांक लावण्याची कारवाई पूर्ण करावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे टेलिफोन जर बंद असतील तर ते लवकरात लवकर सुरू करावेत दूरध्वनीवर आलेला तक्रारीचा फोन हा रेकॉर्ड करण्यात यावा. आणि त्या तक्रारीचे निराकरण करावे, असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच यासंबंधीच्या सूचना उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिलेल्या आहेत.