कराड प्रतिनिधी | आमच्या हजारो एमए, पीएचडी पदव्या ओवाळून टाकाव्यात एवढा मोठा त्याग अणि सेवाव्रत मुकादम तात्यांचे आहे. ते केवळ चौथी शिकले होते. मात्र ग्रामीण मातीतून पंरपरेने चालून आलेले नेतृत्वगुण त्याच्याठायी होते. भविष्यातील पीढी ज्ञानवादी, भक्तीनिष्ठ अणि सत्यवादी घडवायची असेल तर त्यासाठी शांततेची गरज आहे. शांतता हेच खरे विकासाचे सूत्र आहे. त्यासाठी हमाल ते दानशूर बनलेल्या मुकादम तात्यांचे कतृत्व, दातृत्व प्रत्येकाने जोपासावेच लागेल, असे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. कुसूर (ता. कराड) येथील सदगुरू गाडगे महाराज विद्यालय व पांडूरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघातर्फे 38 व्या मुकादम साहित्य पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांना झाले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
आज मीपणाची स्पर्धा वाढत चालली आहे. त्यांच्या परिणाम शिक्षणावर होत आहे. शिक्षण व्यवस्थेतील पाच- दहा टक्के लोक कामचुकार, बेमान व व्यसनी आहेत. केवळ पुढार्यांच्या बॅग उचलण्यासाठीच ते पळतात. त्यासाठी सरकार त्यांना पगार देते का?, असा प्रश्न उपस्थित करून डॉ. सबनीस म्हणाले, लोकशाहीचे खरे मारेकरी राजकीय व्यवस्था आहे. समोरच्या पिढीत 50 कोटीला विकणारा खासदार निर्माण करायचा का, 10 कोटीला पक्ष बदलणारा आमदार निर्माण करायचा, पाच-दहा हजाराला विकला जाणारा सरपंच की दारूच्या बाटलीला आणि छटाकभर चिवड्याला विकणारा मतदार तयार करायचा? हाच सर्वांसमोरचा प्रश्न आहे. खरा जातीयवाद तेच वाढवत आहेत. त्यासाठी फुले- शाहू आंबेडकर अणि छत्रपतींचा महाराष्ट्र, आगरकरांचा महाराष्ट्र तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. हे चित्र बदलायचे असेल तर, शिक्षक, प्राध्यपक यांनी आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. सत्य अणि मानवता हाच खरा धर्म भावी पिढीला शिकवला पाहिजे. मुकादम पुरस्कारांमध्ये माजी विद्यार्थी संघाचे योगदान मोलाचे आहे. असे मत अध्यक्षीय भाषणात श्री. राजमाने यांनी व्यक्त केले.
प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार बामणवाडी (ता. कराड) येथील श्रीलक्ष्मीदेवी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक धनंजय पवार यांना तर चैतन्य पुरस्कार येळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र विद्यालयाचे उपशिक्षक पोपट काटकर यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. या वेळी सुवर्णझेप स्मरणिकेचे प्रकाशनही कण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहनराव राजमाने होते. राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, प्रा. जे. पी. देसाई, ए. आर. मणेर, तात्यांची कन्या श्रीमती हिराबाई पाटील, सौ. ललिता सबनीस, अभिनेते समृध्दी जाधव, एस. के. कुंभार, प्राचार्य ए. आर. जानुगडे, संघाचे अध्यक्ष आर. एल. नायकवडी, उपाध्यक्ष वि. दा. कुराडे, एस. के. कुंभार, राजेंद्र चव्हाण, अभय गरगटे, विलासराव कदम, सुभाष कदम, संपतराव पवार, व्ही. आर. सुतार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक-विद्यार्थी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. श्री. नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बी. एम. कांबळे यांनी आभार मानले.