मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील वाळकेश्वर येथील एलिझाबेथ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आपल्याला नीट उपचार मिळत नसल्याचा आरोप करत एका रुग्णाने आपल्या जवळच्या चाकूने नर्सवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान नर्सला वाचविण्यासाठी डॉक्टर आणि वॉर्डबॉय पुढे आले असता त्यांच्यावरसुद्धा त्या रुग्णाने हल्ला केला. हल्ल्या केल्यानंतर हा रुग्ण पळून गेला. त्यानंतर मलबार हिल पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला वरळी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
काय आहे नेमकं प्रकरण
लोअर परळच्या ना. म. जोशी मार्गावर राहणाऱ्या तरुणाला कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे १३ एप्रिलला त्याला एलिझाबेथ रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयाने त्याच्या काही चाचण्या केल्या. इतर चाचण्यांचे अहवाल आले फक्त कोरोनाचा अहवाल येणे बाकी होते. १५ एप्रिल रोजी ड्युटीवर असणाऱ्या नर्सने इतर रुग्णांप्रमाणे या रुग्णाला देखील ४ गोळ्या दिल्या. या गोळ्या घेत असताना त्यातील दोन खाली पडल्या. त्यानंतर या रुग्णाने माझी ऑक्सिजन पातळी खालावली आहे, मला आयसीयूमध्ये दाखल करा, अशी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर नर्सने त्याला शांत राहायला सांगून ऑक्सिजन तपासले असता ते व्यवस्थित होते. त्यादरम्यान दुसऱ्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा या रुग्णाने पाठीमागून येऊन नर्सवर चाकूने वार केला. त्याला अडवण्यासाठी जेव्हा नर्स मागे वळताच त्याने तिच्या मानेवर, डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर वार केले. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले डॉक्टर आणि वॉर्डबॉय नर्सच्या मदतीला आले तेव्हा हा रुग्ण चाकू घेऊन त्यांच्यासुद्धा मागे लागला.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले असता मलबार हिल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयबाहेर पळालेल्या रुग्णाला शोधून त्याला उपचारासाठी वरळी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्या रुग्णावर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा-संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजारातून बरा झाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मलबार हिल पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.