मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, ज्याला मुंबईत क्रूझवर ड्रग्स पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती, त्याच्या अडचणी वाढल्या आहे. आर्यन खानला आणखी काही दिवस तुरुंगातच काढावे लागतील. शुक्रवारी न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज फेटाळले. एएसजी अनिल सिंग कोर्टात एनसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.
न्यायालयीन कारवाईनंतर आर्यन खानसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले. असे सांगितले जात आहे की, पुरुष कैद्यांना आर्थर रोड कारागृहात आणि महिला कैद्यांना भायखळा कारागृहात पाठवण्यात आले. आर्थर रोड जेल हेच जेल आहे जेथे दहशतवादी कसाबला ठेवले गेले होते. याशिवाय अबू सालेम आणि अभिनेता संजय दत्त यांनीही त्यांची शिक्षा इथेच पूर्ण केली आहे. आर्यन आणि इतर आरोपींना कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर बांधलेल्या तुरुंगाच्या बॅरेक क्रमांक तीनमध्ये ठेवले जाईल.
क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल
सतीश मानशिंदे हे आर्यन खानच्या बाजूने न्यायालयात हजर आहेत. ते कोर्टात म्हणाले की,”NCB ला आर्यनविरुद्ध काहीही सापडले नाही, त्यांनी फक्त आरोप केले आहेत. माहितीनुसार, आर्यन खान आणि इतर कैद्यांना तुरुंगात पहिले तीन ते पाच दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल.
तर दुसरीकडे, अरबाज मर्चंटचे वकील तारिक सईद म्हणाले की,”अरबाजला या प्रकरणातील इतर सहआरोपींशी जोडण्याचा कोणताही पुरावा नाही. अशा परिस्थितीत येथे कोणत्याही प्रकारची कॉन्सपिरसी नाही.” तारिकने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले.
आता हे पाहावे लागेल की, सत्र न्यायालय अरबाजला जामीन देते की नाही. असे सांगितले जात आहे की, सत्र न्यायालयाची प्रक्रिया खूप लांब असते, अशा परिस्थितीत अरबाजला जामीन मिळण्यासाठी 20 दिवस लागू शकतात. शुक्रवारी न्यायालयाने क्रूज पार्टीत पकडलेल्या नायजेरियन आरोपी पॅडलरला 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.