‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा!’ मागणी करत कोळी भगिनींचा राज ठाकरेंभोवती गराडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईतील मासे विक्री व्यवसायावर अनधिकृत परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांना हटवण्याची मागणी जोर धरत आहे. ‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा’ असं म्हणत आज कोळी भगिनींनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी धडक देत त्यांना गराडा घातला. “राजसाहेब बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येतो आहे. आमचा व्यवसाय मंदावला आहे तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता” अशी मागणी करत मुंबईतल्या डोंगरी भागातील कोळी भगिनींनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्याशी काही वेळ संवाद साधला आणि प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं.

राज ठाकरे यांची वेळ न घेता या कोळी भगिनी थेट त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज या ठिकाणी आल्या होत्या. परप्रांतीयांऐवजी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना रोजगाराची, व्यवसायाची संधी मिळावी यासाठी राज ठाकरे कायमच आग्रही असतात. त्यांच्या भाषणांमधून त्यांच्या वक्तव्यांमधून आणि मनसेच्या आंदोलनांमधून ही भूमिका वारंवार स्पष्ट झाली आहे. हे ठाऊक असल्यानेच मुंबईतल्या कोळी महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवण्याची मागणी केली आहे. राज ठाकरेंनीही या प्रकरणी लक्ष घालून योग्य मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कोळी महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणाल्या कोळी भगिनी?
१)परप्रांतीय बेकायदा फेरीवाल्यांचा वावर डोंगरी परिसरात वाढला आहे त्यांना हटवण्यात यावं.

२)आम्ही परप्रांतीय बेकायदा व्यावसायिकांमुळे व्यवसाय करु शकत नाही, या प्रश्नी मार्ग काढावा.

३)कोळी बाजाराच्या बाहेर अनधिकृत मासे विक्रेते आहेत त्यांच्यामुळे आमच्या पोटावर पाय येतो आहे तुम्ही या प्रकरणी तोडगा काढावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.