हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Vande Bharat । यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होणार असून गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही जास्त असते… एकवेळ नोकरीवर लाथ मारायची वेळ आली तरी चालेल पण गणपती उत्सवाच्या काळात कोकणी माणूस मूळगावी कोकणात जाणार म्हणजे जाणारच…. भारतीय प्रशासनाने सुद्धा कोकणी माणसाची हि भावना जाणून कोकणात जाणाऱ्या वाहतूक सेवा वाढवल्या आहेत. चाकरमान्यांना आरामात आणि कमी वेळेत कोकणात जाता यावं यासाठी मुंबई पुण्याहून अनेक स्पेशल एसटी बसेस, रेल्वे, विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तरीही कोकणात जाणारी गर्दी आटोक्यात यावी यासाठी आता रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे आता रेल्वेकडून वाढवण्यात आले आहेत.
खरं तर मुंबईवरून गोव्याला जाणारी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस हि यापूर्वी ८ डब्ब्यांची होती. परंतु आता गणेशभक्तांची वाढती गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांसाठी २२२२९/२२२३० मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे १६ डब्यांच्या सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल हा कायमस्वरूप नाही, तर फक्त गणेशोत्सवानिमित्त असेल. त्यानंतर ती पुन्हा तिच्या नियमित कॉन्फिगरेशनमध्ये आणली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं.
कोणकोणत्या दिवशी धावणार ? Mumbai Goa Vande Bharat
16 डब्यांची मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 25,27,29 ऑगस्ट रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून मडगावला धावेल आणि 26,28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून पुन्हा मुंबईकडे धावणार आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन (Mumbai Goa Vande Bharat) आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा ६ दिवशी धावते आणि ७ तास ४५ मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान ती दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या रेल्वे स्थानकांवर थांबते. मुंबईतून कोकणात आरामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस अतिशय महत्वाची आहे. आता तर ऐन गणेशोत्सवात या ट्रेनला १६ डब्बे जोडल्याने कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे




