मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुसाट होणार असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी 238 नवीन लोकल गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांमुळे लोकलमधील गर्दी कमी होईल आणि लाखो प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
238 नवीन लोकल गाड्यांचा उभारणी प्रकल्प
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबईसाठी 238 उच्च दर्जाच्या लोकल गाड्यांचा प्रकल्प जाहीर केला. त्यांनी सांगितले की, ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार केल्या जातील. या गाड्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, तसेच जुने गाड्या आणि डबे बदलून त्यांची गुणवत्ता सुधारली जाईल.’ या प्रकल्पामुळे प्रवाशांच्या सुविधेत मोठा बदल होईल आणि मुंबईतील रेल्वे सेवा आणखी सुधारेल.
कमी भाड्यात उत्कृष्ट सेवा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना कमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, पण आम्ही फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47% अनुदान देत आहोत. 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले गेले होते आणि 2023-24 मध्ये ते वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले आहेत,’ असे त्यांनी सांगितले.
रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत
अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या आर्थिक स्थितीबद्दलही माहिती दिली. ‘भारतीय रेल्वे गरीब प्रवाशांसाठी चांगली सेवा देण्यास वचनबद्ध आहे. आम्ही सामान्य डब्यांची संख्या एसी कोचच्या तुलनेत 2.5 पटींनी वाढवत आहोत. आम्ही 17 हजार नॉन-एसी कोच तयार करत आहोत. सध्या भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, आणि रेल्वे स्वतःच्या उत्पन्नातून सर्व खर्च करत आहे,’ असे त्यांनी सांगितले. या घोषणा आणि प्रकल्पांमुळे मुंबईतील लोकल सेवा अधिक आरामदायक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे.