हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईची लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन… रोज सकाळी उठायचं आणि लोकलने ऑफिसला जायचं हा मुंबईकरांचा रोजचा दिनक्रम…. लोकल ट्रेनमुळे जलद प्रवासही होतोय आणि वाहतूक कोंडीतून सुटकाही… मात्र लोकलच्या गर्दीने मुंबईकरांना त्रास होतोय हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यातच मागच्या महिन्यात मुंब्रा लोकल ट्रेनमधील अपघातानंतर प्रवाशांचा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता तर मुंबई लोकल ट्रेन बाबत हादरवणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. मागच्या ८ वर्षात मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ८२७३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईची हि लाईफलाईन आता डेथलाईन बनली आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मध्य रेल्वेने (Mumbai Local Train) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबई लोकल ट्रेन मधील प्रवास किती असुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, २०१८ मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना लोकलसमोर येऊन १०२२ लोकांचा मृत्यू झाला. याच वर्षात लोकलमधून पडून ४८२ लोकांचा प्रवाशांचा मृत्यू झाला.
कोणत्या वर्षी किती मृत्यू– Mumbai Local Train
2019 मध्ये ट्रॅक ओलांडताना 920 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 426 मृत्यूची नोंद झाली.
2020 मध्ये ट्रॅक ओलांडताना 471 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 134 मृत्यू झाले.
2021 मध्ये ट्रॅक ओलांडताना 748 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 189 मृत्यूची नोंद झाली.
2022 मध्ये ट्रॅक ओलांडताना 654 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 510 मृत्यू झाले. धावत्या ट्रेनमधून पडून झालेल्या मृत्यूंची संख्या खूपच वाढली.
2023 मध्ये ट्रॅक ओलांडताना 782 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 431 मृत्यू झाले.
2024 मध्ये ट्रॅक ओलांडताना 674 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 387 मृत्यू झाले.
2025 (मे पर्यंत): ट्रॅक ओलांडताना 293 मृत्यू आणि धावत्या ट्रेनमधून पडून 150 मृत्यू झाले आहेत.
मुंबई लोकलचे अपघात (Mumbai Local Train) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे, रेल्वेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि धोकादायक प्रवास टाळणे गरजेचे आहे. तसेच प्रवास करताना कोणताही स्टंट करू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी..




