Mumbai Metro : मुंबई मेट्रोने रचला इतिहास!! एकाच दिवशी 2.94 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक

Mumbai Metro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro । एकीकडे पावसाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना दुसरीकडे मुंबई मेट्रोने मात्र वेगळाच रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. एकाच दिवशी २.९४ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचा कारनामा मुंबई मेट्रोने केला आहे. १८ जून २०२५ रोजी मुंबई मेट्रोतून तब्बल २९४,६८१ प्रवाशांनी प्रवास केला आहे. या रेकॉर्ड ब्रेक प्रवासी वाहतुकीनंतर मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने ट्विट करत प्रवाशांचे आभार मानले आहेत. तसेच प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवासाची हमी सुद्धा दिली.

काय आहे महा मेट्रोचे ट्विट? Mumbai Metro

महा मुंबई मेट्रोने भरारी घेतली आहे! आमच्या प्रिय प्रवाशांनो, तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आमची प्रवासी संख्या सातत्याने वाढत आहे. १८ जून रोजी आम्ही २,९४,६८१ प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला, जो एका दिवसातला सर्वात जास्त आहे. ही वाढ केवळ तुमच्या आमच्यावरील विश्वासामुळे आणि आमच्या टीमच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे शक्य झाली आहे. तुमच्या पाठिंब्याने आम्हाला दररोज अनेक टप्पे पार करण्याची आशा आहे. हवामान काहीही असो, महा मुंबई मेट्रो तुम्हाला सुरक्षित, आरामदायी प्रवासाची हमी देते. धन्यवाद… असं ट्विट मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने केलं आहे.

कोणत्या दिवशी किती लोकांचा प्रवास –

कोणत्या दिवशी किती प्रवाशांनी महामेट्रो (Mumbai Metro) मधून प्रवास केला याचीही आकडेवारी मेट्रो कडून सांगण्यात आलेली आहे. त्यानुसार, १८ जून २०२५ रोजी २९४,६८१ प्रवासी , ७ ऑक्टोबर २०२४ रोजी २९२,५७५ प्रवासी होते, ५ सप्टेंबर २०२४ रोजी अंदाजे २८१,२४९ , ३ सप्टेंबर २०२४ रोजी २७९,७१७ प्रवासी, १३ ऑगस्ट २०२४ रोजी २७८,४४३ प्रवासी आणि ६ ऑगस्ट २०२४ रोजी २६९,२३० प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. विशेष बाब म्हणजे १८ जून रोजी संपूर्ण मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असतानाही मेट्रोतून २.९४ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. आणि मेट्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

खरं तर वाढती लोकसंख्या आणि रस्ते वाहतुकीतील मर्यादा यामुळे मुंबईचा लोकल ट्रेन वर चांगलाच ताण यायचा… यावर मात करण्यासाठी मुंबईत मेट्रो सेवा (Mumbai Metro) सूरु करण्यात आली. मेट्रो मुळे लांब पल्ल्याचे अंतर सुद्धा कमी वेळेत पार करणे शक्य झाले. यामुळे मुंबईकरांचा वेळ तर वाचलाच याशिवाय त्यांना आरामदायी प्रवासाचा आनंद सुद्धा घेता येतोय. त्यामुळे मुंबईकरांची मेट्रोला असलेली पसंती दिवसेंदिवस वाढतच आहे.