हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro। मुंबई लोकल वरचा ताण कमी होण्यासाठी मुंबईत मेट्रो सेवा सुरु झाली. मुंबईत आज अनेक लाईनवर मेट्रो ट्रेन दिमाखात धावत आहे. मुंबई मेट्रोमुळे प्रवासाचा ताण हलका झाला असून प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचत आहे. आता या मेट्रोचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये होणारी गर्दी आणखी कमी करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार, मेट्रो लाईन्स २अ आणि ७ वर २१ अतिरिक्त सेवा सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुद्धा मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर सेवा वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.
२१ अतिरिक्त फेऱ्या – Mumbai Metro
८ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर ३ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास करत विक्रमी संख्या गाठली होती. प्रवाशांचा मेट्रो वर असलेला विश्वास यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला. या प्रवाशांचा प्रवास सोप्पा व्हावा यासाठी एमएमआरडीएने या दोन्ही मेट्रो मार्गावरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली. त्यानंतर एमएमएमओसीएलने या दोन्ही मार्गवर २१ अतिरिक्त सेवा सुरू केल्या आहेत. यापूर्वी या मेट्रो मार्गावर दररोज २८४ ट्रिप व्हायच्या, आता हा आकडा ३०५ पर्यंत वाढला आहे. यासाठी ३ नवीन मेट्रो सेवेत (Mumbai Metro) दाखल करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांसाठी मेट्रोने दिलेली आणखी एक गुड न्यूज म्हणजे आता मेट्रो प्रवासाचा (Mumbai Metro) वेळही वाचणार आहे. मुंबई मेट्रो लाईन्स २अ आणि ७ वरील पीक-अवरचा म्हणजेच गर्दीच्या वेळीच प्रवास ६ मिनिटे ३५ सेकंदांवरून ५ मिनिटे ५० सेकंदांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या बदलामुळे आता प्रवाशांना मेट्रोची जास्त वाट बघायला लागणार नाही. आणि प्लॅटफॉर्म वरील गर्दीही लक्षणीयरीत्या कमी होईल. दुसरीकडे जेव्हा जास्त गर्दी नसते अशा वेळेतील मेट्रो फेऱ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या आधीप्रमाणेच ९ मिनिटे ३० सेकंदांवर सुरू राहतील.




