व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : पट्टेरी वाघाचे कातडे अन् नखांच्या तस्करीप्रकरणी महाबळेश्वरच्या तिघांना अटक; 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पट्टेरी वाघाचे कातडे व वाघ नखांची तस्करी केल्या प्रकरणी महाबळेश्वरच्या 3 जणांना बोरीवली (मुंबई ) पोलीसांनी अटक केली आहे. ज्या पट्टेरी वाघाच्या कातड्याची व नखांची तस्करी केली. तो वाघ नक्की कुठला? कोणी त्याची शिकार केली? महाबळेश्वरच्या तिघा तस्करांचा पट्टेरी वाघाच्या शिकारीत सहभाग कसा काय? याचा तपास सद्या मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या स्टार कासवानंतर आत्ता चक्क पट्टेरी वाघाची शिकार व तस्करी प्रकरणामुळे कराड पाठोपाठ महाबळेश्वरचा वनविभाग राज्यात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

सुरज लक्ष्मण कारंडे (वय 30 वर्षे), मोहसीन नजीर जुंद्रे (वय 35 वर्षे), मंजुर मुस्तफा मानकर (वय 36 वर्षे) तिघेही रा. महाबळेश्वर, जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी कि, मुंबईतील एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांना त्यांच्या खबऱ्याकडुन गोपनीय माहिती मिळाली की, महाबळेश्वर येथून राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाच्या कातडयाची व नखांची तस्करी करून विक्री करण्यासाठी एलआयसी मैदान बोरीवली पश्चिममध्ये महाबळेश्वर येथून काही लोक येणार आहेत.

बोंबेे यांनी ही माहिती आपले वरीष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन शिंदे व पोलीस निरीक्षक कुडाळकर यांना दिली. या गंभीर प्रकाराची माहिती पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांना दोन्ही आधिकार्‍यांनी दिल्यानंतर उपायुक्त बन्सल यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे,अखिलेश बोंबे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, संदीप परीट, प्रशांत हुबळे, गणेश शेरमाळे यांच्या पथकाने सापळा कारवाई करून महाबळेश्वरच्या तिन जणांना वाघाचे कातडे व नखांची तस्करी प्रकरणी जेरबंद केले.

पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वरच्या तिघांवर पट्टेरी वाघाची तस्करी केल्याप्रकरणी एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे मुंबई येथे भादवी 9 , 39 चा 3 ,44 ,48 अ , 49 ब , 51 वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी जप्त केला 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल

महाबळेश्र्वर येथील तिघा संशयित आरोपींनी वाघाचे सोलून काढलेले काळया पिवळया रंगाचे पट्टे असलेले 114 सेंटीमिटर लांब व 108 सेंटीमिटर रूंद वाघाचे कातडे तसेच 12 वाघनखे असा सुमारे 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल बोरीवली पोलीसांनी त्यांच्याकडून जप्त केला.