हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. याप्रकरणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता व्हिडिओ प्रकरणाच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. किरीट सोमय्या यांचा व्हायरल झालेला आक्षेपार्ह व्हिडिओ खरा असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
तपास पथकाने या व्हिडिओचे विश्लेषण केले असून त्यामध्ये हा व्हिडिओ मॉर्फ केलेला नसल्याचे आढळून आले आहे. सुत्रांनी केलेल्या या दाव्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, याप्रकरणात राज्य महिला आयोगाने देखील लक्ष घातले असून त्यांनी मुंबई पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ऑडिओ प्रकरणात जर किरीट सोमय्या दोषी आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. सध्या मुंबई पोलीस हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास करीत आहेत.
दरम्यान, गेल्या १७ जुलै रोजी एका मराठी वृत्तवाहिनीकडून किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ चालवण्यात आला होता. या व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे किरीट सोमय्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर या व्हिडिओचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडे सोपवण्यात आला होता. यानंतर तपास शाखेने संबंधित वृत्तवाहिनीकडून व्हायरल व्हिडिओ मागवून घेतला होता. आता या व्हिडिओचे विश्लेषण करण्यात आले असून हा व्हिडीओ खरा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.