हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा दुर्घटनेचा महामार्ग झाला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय. गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज तर मुंबई -पुणे महामार्गावर प्रवास करताना एका कारला भीषण आग लागल्याची दुर्घटना पाहायला मिळाली आहे. या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून तब्बल 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील खोपोली जवळ पुणे लेनवर कारला आग लागली आणि यामध्ये कार जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु अजूनही अग्नीशमन दलाला आग विझवण्यात यश आलेले नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर कारला भीषण आग pic.twitter.com/mMQUbe64Aw
— Akshay Patil (@AkshayP21845027) April 30, 2023
दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून जवळपास 10 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडतात, अशा लोंकानाही या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.