हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेत्यांवर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे. अशात पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मात्र, आता न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. तुर्तास त्यांना अटक न करण्याचे आदेशही दिलेले आहे.
मुंबई सत्र न्यायालयात काल पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाने एकनाथ खडसे यांना वैद्यकीय कारणांमुळे दिलासा दिला. तसेच त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार असे सांगितले आहे.
परंतु सुनावणीवेळी एकनाथ खडसेंच्या पत्नी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यामुळे खडसेंसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या बरोबर त्यांच्या पत्नीलाही आता चौकशीच्या फेऱ्यात उभे केले होते. दरम्यान न्यायालयाने आज खडसेंच्या पत्नीविरोधात निर्णय दिला असून त्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.