मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस , जूनच्या शेवटी सेवेला सुरुवात होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर भारतातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बरेली ते मुंबई दरम्यान देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा ट्रायल यशस्वीपणे पार पडला आहे. ही गाडी सुरू झाल्यानंतर अलीगढ़ ते मुंबई हे अंतर केवळ 10 तासांत पार करता येणार असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

सध्या बरेली आणि मुंबई दरम्यान केवळ बरेली-लोकमान्य टिळक एक्सप्रेस ही गाडी धावत असून, तिला मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी 16 ते 17 तास लागतात. यामुळे या मार्गावरील प्रवाशांसाठी गाडीची संख्या आणि सेवा दोन्ही अपुरी होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने बरेली, अलीगढ़, आग्रा, ग्वालियर, झाशी, बीना, भोपाळ, इटारसी, खंडवा, जळगाव आणि मनमाड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणारी वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारी या नव्या गाडीचा ट्रायल बरेली ते अलीगढ़ दरम्यान 110 किमी प्रतितास वेगाने पार पडला. या ट्रायलमध्ये मुख्य लोको पायलट सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण चाचणी प्रक्रिया राबवण्यात आली. यानंतर उर्वरित मार्गावरही चाचण्या होणार असून, सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाल्यास जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यात ही सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाईल.

ही पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन असून, यामध्ये एकूण १६ डब्बे असतील. यात AC-3 टियर, AC-2 टियर आणि AC फर्स्ट क्लास असे विविध प्रवर्ग असणार असून, एकूण ८०० हून अधिक प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतील. यापूर्वी वंदे भारत सेवा केवळ चेयर कार पर्यंत मर्यादित होती. त्यामुळे ही नवीन स्लीपर सेवा ही वंदे भारतच्या प्रगतीतील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

ही गाडी सुरू झाल्यानंतर मथुरा, आग्रा, अलीगढ़ व आसपासच्या भागातील व्यावसायिक आणि प्रवाशांना थेट, वेगवान आणि आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ही सेवा वेळेवर सुरू झाल्यास प्रवाशांसाठी एक नवा अध्याय खुला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही भारत सरकारने सुरु केलेली एक आधुनिक आणि उच्च-गतीची प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही ट्रेन मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत पूर्णतः देशात तयार करण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, यात स्वयंचलित दरवाजे, GPS आधारित प्रवास माहिती प्रणाली, आरामदायक आसने, आणि उत्कृष्ट वातानुकूलन यांसारख्या सुविधा आहेत. या गाड्या सध्या चेयर कार प्रकारात उपलब्ध असून, त्यांचा वापर मुख्यतः शहरांमधील मध्यम अंतराच्या प्रवासासाठी केला जात आहे.

भारत सरकारने वंदे भारत ट्रेनद्वारे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक रेल्वे सेवा देण्याचा उद्देश ठेवला आहे. देशात अनेक प्रमुख मार्गांवर वंदे भारत गाड्या चालू असून, त्या वेळेची बचत आणि प्रवासाचा दर्जा यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहेत. याच यशस्वी योजनेचा पुढचा टप्पा म्हणजे स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस, ज्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. बरेली-मुंबई मार्गावरील नवीन स्लीपर वंदे भारत ही त्या दिशेने टाकलेली महत्त्वाची पावले आहे.