औरंगाबाद – मनपाचा गुंठेवारी नियमितीकरण मोहिमेच्या माध्यमातून 66 कोटी दहा लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या मोहिमेतून आतापर्यंत एकूण 4 हजार 669 मालमत्ता नियमित झाल्याचे गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले यांनी सांगितले.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपावर टाकण्यात आली. मनपाने रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता नियमितीकरणाचे दर निश्चित केले. निवासी मालमत्तांसाठी रेडीरेकनर दराच्या 50 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर व्यवसायिक मालमत्तांसाठी संपूर्णपणे रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
मालमत्ता नियमितीकीकरणाची प्रक्रिया मनपाने पाच महिन्यांपूर्वी सुरू केली. या कालावधीत नियमितकरणासाठी 6 हजार 875 प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी 4 हजार 469 प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर 257 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. या माध्यमातून 66 कोटी 10 लाख 95 हजार 96 रुपये जमा झाले. या मोहिमेला सातारा-देवळाई भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागातून 2 हजार 758 संचिका दाखल झाल्या असून, 1 हजार 661 संचिका मंजूर झाल्या आहेत. या प्राप्त महसुलातील 35 कोटी 2 लाख 65 हजार रुपयांचे उत्पन्न हे या भागातील आहे.