औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रस्ताव मागील काही वर्षांपासून निधीअभावी मनपाकडे प्रलंबित होते. परंतु, आता 15 व्या वित्त आयोगातून पहिल्यांदाच मनपाला तब्बल 63 कोटी 51 लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार 16 विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. अवघ्या एका महिन्यात या कामांना सुरुवात होईल अशी माहिती मनपा प्रशासन आयुक्त असते कुमार पांडे यांनी दिली आहे.
मनपा मध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून प्रशासनाने विकास कामांचा सपाटा लावला आहे. सध्या 115 वॉर्ड मधील विकास कामे जवळपास बंद आहेत. फक्त डागडुजीच्या कामांवर भर देण्यात येत आहे. स्मार्ट सिटी कडे वाटचाल करताना शहरातील प्रमुख कामे अनेक वर्षांपासून ठप्प आहेत. या कामांवर आता प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने शहराला 15 व्या वित्त आयोगातून तब्बल 63 कोटी 51 लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाल्याची आनंद वार्ता प्रशासक पांडे यांनी काल दिली. शहराचा लुक बदलण्यासाठी हा निधी खूप उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोणती कामे होणार –
10.38 कोटी – कचऱ्यासाठी शहरात तीन ठिकाणी ट्रन्सफर स्टेशन उभारणार
2.20 कोटी – चिकलठाणा, पडेगाव येथील कचरा नष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी
8.20 कोटी – भुमिगत गटार योजनेत 270 ठिकाणी ड्रेनेजची जोडणी बाकी आहे, त्यासाठी
20 कोटी – मूख्य रस्त्यांवर दुभाजक, झाडे लावणे, फुटपाथ तयार करण्यासाठी
9 कोटी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्यांचे नुतनीकरण
1 कोटी – भविष्यात नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदीसाठी