औरंगाबाद – अलीकडेच महाराष्ट्र शासनाने जातीवाचक नावाचे गाव, शहरे, वस्ती आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील 50 जातिवाचक वसाहतींच्या नावांची प्राथमिक यादी तयार केली आहे. संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नवीन नावे मागवण्यात येतील, त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय होणार असल्याचे उपायुक्त अपरणा थेटे यांनी सांगितले.
जातीवाचक नावामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होतो. औरंगाबाद शहरात मागील अनेक वर्षांमध्ये या मुद्द्यांवरून कधीच तेढ निर्माण झाला नाही. मात्र, शासन निर्णयानुसार मनपा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. मनपा प्रशासन आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वसाहतीची रस्त्यांची नावे शोधण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
याबाबत उपायुक्त थेटे यांनी नमूद केले की, जातीवाचक वसाहतीची रस्त्यांची नावे शोधण्यासाठी वॉर्ड अधिकारी यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार माहिती प्राप्त झाली. आता त्या भागातील नागरिकांकडून नवीन नावे मागविली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर जाहीर प्रगटन देऊन प्रसिद्ध केले जाईल त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.