औरंगाबाद – घराला पायाचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन सुई-पोती विक्री करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींपैकी अनिल सिनाप्पा फुलमाळी (22) याला जन्मठेप व 50 हजारांचा दंडाची शिक्षा तर गुन्ह्यातील सहआरोपी सोनी अनिल फुलमाळी (19) आणि मारी ऊर्फ मालनबाई सिनाप्पा फुलमाळी (50, सर्व रा. रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांची चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडीया यांनी काल दिले.
प्रकरणात मृत संतोष स्वामी गुडे (22, रा. संग्रामनगर) याची आत्या गुरुबाई गिडान्ना शेवाळे (50) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादीच्या घरा शेजारी मृत व त्याचे कुटुंब राहत होते. 10 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री दीडच्या सुमारास मृताची बहिण फिर्यादीच्या घरी गेली व अनिल फुलमाळी याच्या घराला संतोषच्या पायाचा धक्का लागल्याने अनिल त्याची पत्नी सोनी आणि आई मारी ऊर्फ मालनबाई हे संतोषला बेदम मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने घराबाहेर धाव घेतली तेव्हा वरील तिघे आरोपी मृत संतोषला बेदम मारहाण करत होते. आरोपी अनिल फुलमाळी याने संतोषच्या डोक्यात भरीव बांबुने जबर वार करुन गंभीर केले. गंभीर जखमी संतोषला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेच्या अनुषंगाने तपास अधिकारी तथा तत्कालीन सहायक निरीक्षक सुनिल कराळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सूर्यकांत सानेटक्के आणि सहायक लोकाभियोक्ता बी. एम. लोमटे यांनी 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दरम्यान साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. आरोपी अनिल फुलमाळी याला भांदवी कलम 302 अन्वये जन्मठेप व 50 हजारांचा दंडाची शिक्षा ठोठावली. तर सोनी फुलमाळी आणि मारी फुलमाळी या दोघींना कलम 323 अन्वये दोषी ठरवून त्यांची दोन वर्षांच्या चांगल्या वर्तवणूकीच्या हमीवर मुक्तता केली.