औरंगाबाद – दारूच्या अवैध अड्ड्यावर काम करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा शंभर रुपये चोरल्याच्या संशयावरून मारहाण करत खून केल्याची घटना शहरातील आनंदनगरात बुधवारी रात्री घडली. आरोपीने पहाटे दुचाकीवर मृतदेह घेऊन करगिल मैदानाजवळील कचऱ्यात फेकला. पुंडलिक नगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शेख अश्पाक उर्फ मुक्या शेख अब्दुल (18, रा. बंबाटनगर) असे मृताचे नाव आहे. शेख मुबारक ऊर्फ बाबा शेख हैदर (38, रा. आनंदनगर) हा संशयित आरोपी आहे.
कचर्यात मृतदेह पडल्याचे पुंडलिकनगर पोलिसांना फोन वरून कळाले. त्यानंतर पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त विशाल धुमे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी गेले. जखमावरून खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना शोधून काढले तेव्हा घटनेचा उलगडा झाला. मृत मुक्या हा बाबा याच्या अवैध दारू अड्ड्यावर मागील सहा वर्षांपासून कामाला असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. बाबाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केल्यानंतर मुक्याच्या मृत्यू मारहाणीत झाल्याचे मान्य केले. उद्या हा सतत पैसे जोरात असल्याचा संशय बाबाला होता. यापूर्वीही त्याने चोरीच्या संशयावरून त्यास मारहाण केली होती. 100 रुपये चोरल्याच्या संशयावरून बुधवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी बाबाने मारहाण केली. रात्री लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत एक घाव वर्मी लागल्यामुळे मुक्या जागीच गतप्राण झाल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पुंडलिक नगर पोलिसांनी सांगितले.
बाबाचे 27 हजार रुपये देणे होते. ते देण्याची मागणी बाबा त्याच्या वडिलांकडे करत होता. पैसे देऊ शकत नसल्यामुळे मुख्याला दारूच्या अड्ड्यावर काम करण्यास लावत होता. त्यातूनच हत्या झाल्याचा आरोप आहे.