चारित्र्याच्या संशयावरून खून : प्रतापगंज पेठेत कोयत्याने वार करणाऱ्या पतीला जन्मठेप

Satara Court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | येथील प्रतापगंज पेठेतील पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भारत कमलाकर जाधव (वय- 27) असे शिक्षा मिळालेल्या पतीचे नाव आहे. श्रद्धा जाधव (वय -25) असे त्याच्या पत्नीचे नाव होते.

याबाबतची माहिती अशी, चारित्र्याचा संशय घेऊन तो वारंवार श्रद्धाला मारहाण करत होता. 27 जानेवारी 2018 ला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने तिच्या मानेवार कोयत्याने वार केला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी जखमी अवस्थेत ती पहिल्या मजल्यावरून रस्त्यावर धावत आली. रस्त्यावरून पळत जाताना भारतने पाठलाग करून तिच्या हातावर कोयत्याने वार केले. रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

श्रद्धाच्या खुनाबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाहूपुरीचे तत्कालीन व सध्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, हवालदार श्रीनिवास देशमुख व आतिश घाडगे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान 11 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील महेश कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश मोरे यांनी भारताला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या सहायक फौजदार घारगे, हवालदार शुभांगी भोसले, शमशुद्दीन शेख, ए. के. खुडे, जी. एस. फरांदे, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी सहकार्य केले.