खंडाळा | शिरवळ (ता. खंडाळा) येथील एसटी बस स्थानकाच्या सुलभ प्रसाधनगृहात गळा दाबून व डोके आपटून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. रणजित गणपत जाधव (वय- 40, रा. बौद्ध वस्ती, शिरवळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरवळ बस स्थानकातील सुलभ प्रसाधनगृह चालवण्याचे काम रणजित करत होते. शिरवळ एसटी बस स्थानकावर गुरुवारी रात्री अज्ञाताने रणजित यांचा गळा दाबून, जमिनीवर डोके आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूकडून रक्त आले असल्याचे दिसते. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आल्यानंतर शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.
शिरवळ पोलिस घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून व श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडून काही धागेदोरे हाती लागतील का, याची चाचपणी करत आहे. या घटनेबाबत काही संशयितांची दिवसभर चौकशी करण्यात आली. वाईचे पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे व फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे करीत आहे.