ED च्या चौकशीची मागणी करुन सुप्रियाताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केलंय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : महापालिका निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी शहरातील राजकिय वातावरण तापू लागलं आहे. महापालिकेने कचरा व्यवस्थापनावर केलेला खर्च सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करावी अशी मागणी केली आहे. यावर अशी मागणी करुन सुप्रियाताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केलंय असा टोला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.

पुणे महापालिका निवडणूका जवळ आल्याने सुप्रियाताईंना पुण्याच्या कचरा प्रश्नाची आठवण झाली असून त्यांनी कचऱ्यासाठी झालेल्या खर्चाची चौकशी ED मार्फत करण्याची मागणी केली आहे. सुप्रियाताईंनी ED मार्फत चौकशीची मागणी करणे म्हणजे त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणांवर पक्का विश्वास आहे, हे मी मानतो आणि त्याचं स्वागत करतो. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या ED चौकशी बाबतीतही सुप्रियाताईंनी हाच विश्वास कायम ठेवावा असंही मोहोळ म्हणालेत.

दरम्यान, सुप्रियाताई यांची खासदारकीची यंदा तिसरी टर्म आहे. २०१४ पर्यंत आणि २०१९ नंतर त्यांचे बंधू मा. अजितदादा यांनी सातत्याने पुण्याचे नेतृत्व केले आहे. तरीही पुण्याचा कचरा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे का ? असा सवाल मोहोळ यांनी केला आहे.

उलट गेल्या ४ वर्षात आम्ही कचरा व्यवस्थापनाबाबत केलेल्या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय पातळीवर सातत्याने घेतली जात आहे. अगदी कालच पुण्याच्या Waste Managment ची दखल केंद्राने घेतली. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६ नवे प्रकल्प हे आमच्याच काळात म्हणजे गेल्या चार-साडेचार वर्षांत सुरू झाले. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात पुणे महानगरपालिका आल्यानंतर पुणे शहराच्या कचरा प्रक्रियेची क्षमता १२०० मेट्रिक टनावरून १८०० मेट्रिक टनापर्यंत वाढवली गेली. याचीही माहिती महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ‘एक्टिव्ह’ होत असलेल्या सुप्रियाताईंनी घ्यावी असं मोहोळ म्हणालेत.

राष्ट्रवादीने अनेक सुरू होणारे प्रकल्प तोडफोड करून जाळपोळ करून बंद पाडले. मात्र केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कचऱ्यावर झालेल्या खर्चाची मागणी करणे म्हणजे ताईंनी स्वतःच्याच अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे असं म्हणत मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय.