हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रसिद्ध शास्त्रिय गायक राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही काळापासून रशीद खान कर्करोगावर उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राशिद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर कोलकताच्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते. गेल्या काही काळापासून राशिद खान यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. अशातच आज त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. आता राशिद खान यांच्या पार्थिवावर 10 जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासहित अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, राशिद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये झाला होता. ते रामपूर- सहसवान घराण्यातून आले होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिली मैफिल केली होती. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे राशिद खान यांना पद्मभूषण पुरस्कार आणि पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.