सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले. त्यामुळे चंद्रकांत पाटील अस्वस्थ होऊन अशा पद्धतीची विधाने करत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे म्हणत खा. शरद पवार यांनी श्री. पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन या इमारतीचे उदघाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली होती. यावर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खा. शरद पवार हे सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे जाणार आहेत. तेथून ते मुंबई बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोळस्कर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.