पुणे | बारामतीत माझं काम बोलतं. त्यामुळे बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणार कोणी असेल तर बारामतीकर त्यांचा विचार करतील. कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नसतात. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर हुरूप येतो, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फक्त प्रसिद्धीसाठी बारामतीला आले, असा टोला अजित पवारांनी लगावला. ते म्हणाले, ‘ ते बारामतीला आले नसते तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते इथे आले म्हणून प्रसिद्धी मिळाली. ‘मी त्यांना विचारतो, तुम्ही एवढे पक्षाच्या जवळचे होता तर तुम्हाला 2019 ला तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला उमेदवारी का नाकारली? बारामतीत कुणीही इथे यावं. सर्वांचं स्वागतच आहे. पण मतदानाच्या दिवशी कुठं बटण दाबायचं हे बारामतीकरांना चांगलंच माहिती आहे. ‘
केंद्राने आणि राज्याच्या एजन्सीने चाैकशी करावी ः- याकूब मेमन या देशद्रोही माणसाच्या बाबतीत कबरीवर सजावट ज्यांनी कोणी केली आहे. त्यांची केंद्राने व राज्याच्या एजन्सीने चाैकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले असेल, तर तसे दाखवावे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या चुकीच्या घटना घडत असतील. ज्यांनी मूक समंती दिली, कुणी भाग पाडलं. त्याच्यावर कारवाई करा, असे आमचे स्पष्ट मत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले.