सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
केवळ समाज माध्यमांवर प्रसिध्द होण्यासाठी व आवड म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले आहे. चोरटे चाैघेही विद्यार्थी असून केवळ आरएक्स 100 याच गाड्या चोरी करायचे. शिरवळ व सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत ही टोळी दुचाकी चोरी करत होती. याप्रकरणी योगेश बाबर (वय- 18 रा. उडतरे), ओंकार बाबर (वय- 21 रा. केंजळ) या दोघांसह आणखी दोन अल्पवयीनांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.
शिरवळ (ता. खंडाळा) गावचे हद्दीतील आझाद गल्ली मधील घराच्या पार्किंगमध्ये असणारी दुचाकी 29 डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. शिरवळ येथील दुचाकी चोर हा वाई तालुक्यातील भुईज पोलीस ठाणे हद्दीतील असल्याची माहिती शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना समजली.
त्यानंतर शिरवळ पोलिसांनी भुईंज पोलिसांच्या मदतीने उडतरे येथील योगेश बाबर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, दुचाकी चोरीमध्ये आणखी महाविद्यालयीन दोन अल्पवयीनांचा समावेश असल्याचे उघड झाले. ही टोळी फक्त यामाहाच्या आर एक्स 100 याच गाड्या चोरी करायचे. शिरवळमध्ये देखील त्यांना याच प्रकारची गाडी आवडल्याने त्यांनी ती गाड़ी चोरी केली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या जाळ्यात ते सापडले.