सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल नाबार्डच्यावतीने उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना करण्यात आले.
देशातील राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नियंत्रक म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) कामकाज करते . या बँकांच्या नियमित बँकिंग कामकाजावर देखरेख ठेवून बँकांच्या प्रगतीचा आढावा घेते. देशातील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणेसाठी केंद्र सरकारने नाबार्डची १२ जुलै १९८२ रोजी स्थापना केलेली आहे. नाबार्डच्या स्थापनेस ४ दशकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. नाबार्डच्या ४ दशकांच्या वाटचालीत देशातील राज्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी भागीदार या नात्याने मौलीक कामगिरी केलेली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखा, ९५४ विकास सेवा संस्था, ५३ एटीएम व मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा देत आहे. सातारा जिल्हा बँक भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) च्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीवर लिंक झालेमुळे ग्राहकांना अनेक सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. बँक फक्त पीक कर्ज वाटप न करता मध्यम व दीर्घ मुदत कर्ज योजनांचे माध्यमातून कर्ज वाटपात अग्रेसर राहिली आहे.
बँक विकास संस्था सक्षमीकरणासाठी प्रत्येक वर्षी नफ्यातून तरतूद करते त्यामुळे विकास संस्थांना नफ्यात येणेस मदत होत आहे. बॅंकेच्या ऑनलाईन पुरस्कार वितरण समारंभास बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.