हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप पक्ष कुणाला आवडो वा ना आवडो! मात्र सगळ्यांच्यात एक गोष्ट हमखास कॉमन पाहायला मिळते ती म्हणजे भाजपचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे सर्वांचेच आवडणारे किंवा त्यांच्या कामाची दखल घ्यायला भाग पाडणारे नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या या नेत्यानं रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून गडकरींनी टाकलेल्या महामार्गाच्या जाळ्यांपासून ते गावखेड्यात नेऊन पोहचवलेली वाहतूक व्यवस्था निश्चितच दाद देण्यासारखी. हेच नितीन गडकरी ज्या मतदारसंघातून राजकीय प्रतिनिधित्व करतात तो नागपूर लोकसभा मतदारसंघही (Nagpur Lok Sabha 2024) पुऱ्या महाराष्ट्रात ओळखला जाणारा आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणारा…
राज्याची उपराजधानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, दीक्षाभूमी संत्र्यांची मोठी बाजारपेठ अशा संमिश्र गोष्टींची सरमिसळ असणारा हा मतदारसंघ. आधी काँग्रेसचा एकहाती बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ 2014 च्या मोदी लाटेनंतर नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा बनून गेला तो कायमचाच! त्यामुळे येत्या निवडणुकीत गडकरींसारख्या बाहुबली नेत्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडे नक्की उमेदवार आहे तरी कोण? गडकरींच्या शहरी विकास कामांच्या धडाक्याला आव्हान देण्यासाठी विरोधकांकडे नक्की कोणते मुद्दे आहेत? नागपूरकर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय सारीपाटाचा नेमका कसा अर्थ लावतायत? हे आपण जाणून घेऊयात
नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात. यातील नागपूर पूर्व, नागपूर दक्षिण, नागपूर दक्षिण-पश्चिम, व नागपूर मध्य या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर या दोन मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणाचा पट सध्या ज्यांच्या हातात आहे ते देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातूनच प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या मतदारसंघाचं महत्त्व आणखीनच वाढतं…मतदारसंघाच्या इतिहासात डोकवायचं म्हटलं तर स्वातंत्र्यापासून ते अगदी 2014 पर्यंत एक दोन अपवाद वगळता हा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिलाय.
काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहित यांनी तीन वेळा तर विलास मुत्तेमवार यांनी तब्बल चार वेळा या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून येण्याचा करिष्मा करून दाखवलाय. याच तगड्या आणि जिल्ह्याच्या राजकारणावर जरब असणाऱ्या मुत्तेमवार यांची 2014 साली लढत झाली ती भाजपच्या कोअर टीममधील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ असणाऱ्या नितीन गडकरी यांच्यासोबत. गडकरी यांनी नागपूर मतदार संघातील पूर्वापार चालत आलेली ही परंपरा अखेर मोडीत काढली आणि 2 लाख 85 मतांची सर्वाधिक लीड घेत नवा इतिहास रचला होता. यानंतर काँग्रेसची या मतदारसंघावरची पकड सुटली ती कायमचीच!
भाजपमधील अत्यंत वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या गडकरींना पहिल्याच मंत्रिमंडळात दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. या जबाबदारीचं गडकरींनी अक्षरशः सोनं केलं. मोदी सरकारमधील मागील दोन टर्ममध्ये जर का एखाद्या मंत्र्याचं नाव सर्वसामान्य जनतेनं घ्यायचं म्हटलं तर त्यात गडकरी यांचं नाव सर्वात पहिल्यांदा येतं. त्याचं कारण म्हणजे गडकरींची काम करण्याची पद्धत. गडकरींनी आपल्या मंत्रिपदाचा वापर करत रस्ते वाहतुकीचा कायापालट केला. हे सगळं होत असताना त्यांचं आपल्या नागपूर लोकसभा मतदारसंघाकडेही बारीक लक्ष होतं. मेट्रो, मोनोरेल, अत्याधुनिक वाहतूक सुविधा आणि शहरी नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व गरजांची पूर्तता करण्याकडे जनतेचा प्रतिनिधी म्हणून गडकरींचा भर राहिला. 2019 च्या निवडणुकीत भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले आणि शेतकरी नेते म्हणून आपली आगळी वेगळी ओळख असणाऱ्या नाना पटोलेंचं त्यांना कडवं आव्हान होतं.मात्र नागपूरकरांनी कौल अखेर गडकरी यांच्याच बाजूने दिला.
यानंतर 2024 पर्यंतच्या पंचवार्षिक मध्येही गडकरींनी आपल्या कामाचा धडाका कायम ठेवला. गेल्या 15 वर्षापासून महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत नागपुरात कमळ उमलल्याचे दिसते. नागपूरची सामाजिक परिस्थिती भाजपच्या अगदी विरोधी आणि संघाला प्रतिकूल अशीच राहिली आहे. मतदारसंघात दलित, मुस्लिम, तेली, कुणबी आणि हलबा या जातींचं प्राबल्य आहे. यात मुस्लिम, दलित आणि काही प्रमाणात कुणबी हे परंपरागत काँग्रेसचे मतदार आहेत. पण नितीन गडकरी यांच्या सर्वसमावेशक राजकारणाने नागपूर लोकसभा मतदारसंघावर भाजपनं आपली पकड अधिक मजबूत केली. गडकरी जरी दिल्लीत असले तरी आठवड्यातील दोन दिवस ते हमखास आपल्याला मतदारसंघात दिसतात. जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेतात. एकंदरीत मंत्रीपदाचा मोठा तामजम आणि भल्या मोठ्या कामांची यादी असली तरी ते नागपूरकरांसोबत असणारी नाळ कधीच तुटू देत नाहीत हीच त्यांची खासियत! राजकारणापलिकडे जाऊन सेवा उपक्रम, सांस्कृतिक व क्रिडा महोत्सव, ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांसाठी विविध योजना, आयआयटी, आयआयएम, एम्स, लॉ स्कूल, सिम्बॉयसीस विद्यापीठ, मिहान प्रकल्पामध्ये वाढलेले रोजगार, उड्डाण पूल, मेट्रो रेल व सिमेंट रस्त्यांचे जाळे अशी मोठी लिस्ट सध्या गडकरींकडे आहे की ज्याच्या बेसीसवर ते यंदा सहज निवडून येतील.
मात्र काँग्रेस आता नागपूरच्या जागेबाबत सिरीयस झालीय. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर विजय मिळवत पक्षानं आधीच याची चुणूक दाखवून दिलीय. राहुल गांधी यांनीही लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नागपूर मधूनच फोडलाय. त्यामुळे संघाच्या लाडक्या नेत्याला आणि त्याहून आपल्या कार्यकर्तृत्ववान आपली आगळीवेगळी छबी तयार केलेल्या गडकरींना पाडण्यासाठी काँग्रेसचा नेमका काय मेगा प्लॅन असेल? हे पाहावं लागेल. इथल्या जातीय अस्मितांबाबत बोलायचं झालं तर नागपुरात आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासणारे मतदार मोठ्या संख्येने पहायला मिळतात. मात्र रिपल्बिकन पक्ष व बहुजन समाज पक्षात हे मतदार विभागले जात असल्यामुळे निश्चित अशी ताकत नागपुरात पहायला मिळत नाही. मराठा फॅक्टर इथे चालत नाही उलट ओबीसींचं आरक्षण वाचवण्याची मागणी मतदारसंघातून होत आलीये. त्यामुळे या काही गोष्टींची काळजी घेत भाजपला निवडणुकीला सामोरं जावे लागेल.
आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे यंदाच्या निवडणुकीतील चेहरे कोण? एकतर फिक्स आहे ते म्हणजे भाजपकडून नितीन गडकरीचे नाव जाहीर करण्यात आलं आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडे मात्र उमेदवार मिळवण्याचीच मोठी बोंब आहे. कुठलाही मोठा नेता गडकरींविरुद्ध निवडणूक लढण्यास सध्यातरी तयार नाहीये. पदवीधर मतदाससंघातून प्रतिनिधित्व करणारे अभिजीत वंजारी, माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार आणि प्रफुल्ल गुडधे यांसारख्या काही नावांची सध्या काँग्रेस मधून उमेदवारीसाठी चर्चा होतेय. मात्र तिकीट नेमकं कुणाला मिळणार? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे गडकरींनी नागपूरकरांच्या काळजात हात घालून विकासाच्या आणि बेरजेच्या राजकारणाला नेमकं काँग्रेस कसं आव्हान देणार? त्यांना महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची कितपत आणि कशी जोड मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.