‘खाकी’चा सर्जिकल स्ट्राईक; हॉटेल, धाबे चालकांनाही दणका.
सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे
आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने बेसिंग पोलिसिंगवर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी नाकाबंदी व विविध कारवायांचा आकडा वाढतच असून सोमवार, मंगळवारी १५४ केसेस केल्या.सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच वेळी नाकाबंदी करून वाहनांवर कारवाई, अवैध धंदे याच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची मोहीम आखली आहे. आचारसंहिता काळातही रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या ३५ हॉटेल, धाब्यावर कारवाई केली आहे.
आचारसंहिता लागू होवून दोन दिवस होतात न् होतात तोच पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईलच; शिवाय गुंड-पुंडानाही उसंत देणार नसल्याचा इशारा दिला आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्ह्य़ात विविध चौक, कॉर्नर, ब्रीज, बायपास रोड, महत्त्वाच्या जंक्शनवर नाकाबंदी केली. शिवाय रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल, धाब्यांवरही कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्य़ात एकूण 23 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
या मोहिमेदरम्यान 22 अधिकारी व 82 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्याशिवाय विटा उपविभागात दंगल नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान कागदपत्रे नसणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवरही कारवाई केली. नाकाबंदीदरम्यान एकूण २८६ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी 154 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.