हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन व्हावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन वेगवेगळे उपाय योजना राबवत आहे. आता शासनाने युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये (World Heritage Site) समाविष्ट करण्यासाठी 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोकडे पाठवली आहेत. युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024 – 25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांची नावे पाठवली आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी मंत्रालयाने ही नावे पाठवली आहेत.
कोणत्या किल्ल्यांचा समावेश आहे?
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पाठवलेल्या नावांमध्ये राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई – टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी इत्यादी किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांची नावे भारत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी देणार आहे. हे सर्व किल्ले 17 व्या ते 19 व्या शतकात बांधले गेले आहेत. हे किल्ले मराठ्यांच्या शौर्याचा आणि त्यांच्या विजयाचा, लढायचा पुरावा देतात. आतापर्यंत युनेस्कोच्या यादीमध्ये भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. पुढे जाऊन या किल्ल्यांचा देखील युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्यानंतर युनेस्कोच्या यादीत भारताचे स्थान आणखीन वाढेल.
यंदा भारताकडून युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी शिवरायांच्या गडकिल्ल्यांची शिफारस करण्यात येणार आहे. या गडकिल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाल्यास ही बाब संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद असेल. दरम्यान, आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत. यातील फक्त 12 किल्ले मराठा काळातील असल्याचे सांगण्यात येते. यातील आठ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि गिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे.