हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरवर राज्यातील शिंदे (Eknath Shinde) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलत धाराशिव असे केले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली होती. मात्र त्यावेळी जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली नव्हती. परंतु आता मात्र थेट जिल्ह्यांची नावे बदलली आहे. राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन निर्णय होण्याची अपेक्षा
मराठवाड्यात तब्बल सात वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय होतील अशी आशा आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यातील महत्वाचे जलसिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यासंबंधित काय निर्णय होतील; वैद्यकीय व कृषी महाविद्यालयांचा मागणी आहेत. जिल्हा परिषद शाळांचे पुनर्जीवन करण्यासाठी निधी आवश्यक आहेत. या मूळ मागण्या असताना शहराचे व जिल्ह्याचे नाव बदलण्याची जुनी मागणी या बैठकीच्या आधी राजपत्र प्रकाशित करत पुर्ण करण्यात आली आहे असे दिसते.
या आधी काय झालं होत?
याआधीच नामांतरा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना राज्य सरकारने तूर्तास नामांतर न करण्याची भूमिका घेतली होती. आक्षेपांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया पार पडेपर्यंत औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावं वापरली जातील, असं राज्य सरकारकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर आता राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.