हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी मोदीला मारू शकतो, अस विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. मात्र आपण पंतप्रधान मोदींना नव्हे तर गावातील गुंड मोदी बद्दल अस स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते. त्यानंतर आता खरंच मोदी नावाचा गावगुंड सापडला आहे. उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत आपणच तो गावगुंड असल्याचे सांगितले आहे.
उमेश प्रेमदास घरडे याला त्याच्या गोंदी गावातील लोक ‘मोदी’ म्हणून ओळखतात असेही तो म्हणाला आहे. या कथित मोदीसोबत अॅड. सतीश उके उपस्थित होते. या ‘मोदी’ने नाना पटोलेंनी ज्या मोदीला मारण्याची भाषा केली, तो मीच आहे. असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी उमेशच्या नावापुढे मोदी लिहिले असलेली काही जुनी कागदपत्रेही दाखवली. त्यामुळे अखेर नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल अपशब्द वापरले होते तो सापडला आहे.
दरम्यान भाजपने मात्र नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. नाना पटोले यांच्याविरोधात भाजपने राज्यभर आंदोलनही केले. मात्र आता हा कथित मोदी समोर आल्याने हा वाद मिटू शकतो, असे म्हटले जात आहे.