भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचे नेतृत्व देशाने मान्य केले : नाना पटोले

Nana Patole Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात काढली. देशभर काढलेल्या त्यांच्या यात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांच्या यात्रेत काँग्रेस नेते दिसत नसल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर हजारो किलोमीटर भारत जोडो यात्रा काढली. त्यांच्या या यात्रेत लाखो लोक सहभागी झाली आणि त्यांच्यासोबाबत पायी चालले हे भाजपमधील लोकांना दिसत नसेल. राहुल गांधींचे नेतृत्व हे देशाने मान्य केले आहे. त्यामुळे तुम्ही आंधळे होऊ नका, असा सल्ला पटोले यांनी भाजपला दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांकडून मोदींना शिवी देण्यात आल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची शिवी मोदींना देण्यात आलेली नाही. उलट त्यांनी स्वतःलाच रावण म्हणून घेतले आहे. आणि त्याच रावणाला आता कसं चांगलं करता येईल याचा प्रयत्न केला गेला. खरं तर आमच्या पक्षाचे नेते काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्या शब्दाचा अनर्थ काढला गेला आहे.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. यावरून नाना पटोले यांनी मोदींना टोला लगावला. “नरेंद्र मोदींना काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची शिवी दिलेली नाही. एखादा शब्द आपल्या तोंडी घ्यायचा अन् उलटा प्रचार करायचा याच्यात मोदीजी आणि भाजप एक्सपर्ट आहे. त्यांनी स्वतःलाच रावण म्हणून घेतले आहे. आणि त्याच रावणाला आता कसं चांगलं करता येईल याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांच्या शब्दाचा अनर्थ काढला गेला असल्याचे पटोले यांनी सांगितले.

मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले?

अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे झालेल्या प्रचारसभेत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. “मोदी सगळीकडे दिसतात. महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?,” असा सवाल खरगे यांनी केला होता.