नांदेड । मुलगा झाला म्हणून नांदेडच्या एका गृहस्थाने सर्वाना पेढे वाटले आणि काही दिवसातच त्याला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ११६ जणांना विलगीकरणात जाण्याची वेळ आली आहे. मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना अवघ्या काही दिवसातच त्याच्या आनंदावर विरजण पडलं आहे. मुलगा झाल्याच्या आनंदात २४ वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे.
प्रशासकीय यंत्रणेने आता खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.संबंधित २४ वर्षीय तरुण औरंगाबाद येथील कंपनीत काम करतो. ४ जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला. त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ बहीण आहेत. दोन दिवसात तो गावातच आजोळी मामा-मामीलाही भेटला.
मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले.त्याच्या संपर्कात आतापर्यंत ११६ जण आले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलं आहे. न्हाव्याकडे संपर्क झाल्यामुळे नऊ जणांना कंधार येथे स्वॅबसाठी पाठवण्यात आलं आहे. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.दरम्यान, काल दिवसभरात १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५११ इतकी झाली आहे. उपचारादरम्यान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ३४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १४७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.