औरंगाबाद – सध्याची नांदेड-पुणे जुनी साप्ताहिक एक्सप्रेसचे रूपांतर नव्या वर्षात नांदेड-हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये करून ती आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात येणार आहे. तसेच रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला अत्याधुनिक एलएचबी कोचेस लावण्यात येणार आहेत. याशिवाय तिथे थांबे आणि वेळापत्रकही बदलण्यात येणार आहे.
नांदेड पुणे या द्वी साप्ताहिक एक्सप्रेस च्या वेळेत, रेल्वे स्थानकात आणि रचनेत बदल करण्यास सोमवारी रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. हा बदल 2 जानेवारीपासून लागू होणार आहे. ही रेल्वे आता पुणे स्थानक आहे ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकापर्यंत धावेल आणि हडपसर वरूनच सुटेल. या रेल्वेला 2 जानेवारी रोजी जालना रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.
नवीन वेळापत्रकानुसार ही रेल्वे नांदेड हुन रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता सुटेल त्यानंतर, औरंगाबादला रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी दाखल होईल आणि 10 वाजून 25 मिनिटांनी पुढे रवाना होऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी हडपसर येथे सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात हडपसर येथून ही रेल्वे सोमवारी आणि बुधवारी रात्री दहा वाजता सुटेल. औरंगाबादेत दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी दाखल होऊन, त्यानंतर ही रेल्वे नांदेड येथे सकाळी 10 वाजता पोहोचेल.