कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर 4 एप्रिलला सर्व्हिस रोडवर दहावीचा शेवटचा पेपर देऊन घरी जाताना विद्यार्थ्याचा अपघात झाला होता. या विद्यार्थ्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. अक्षय पांडुरंग शिर्के (वय- 16, रा. नांदलापूर, ता.कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : रिक्षाचालक आनंद पांडुरंग शिंदे (रा. चैतन्यनगर, नांदलापूर, ता. कराड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यात पुणे- बंगळूर महामार्गाच्या सेवारस्त्याने नांदलापूर बाजूकडे अक्षय व त्याचा मित्र वेगवेगळ्या सायकलवरून जात होते. दुपारच्या सुमारास मलकापूर हद्दीतील जानव्ही मळा येथे हॉटेल हेस्टी-टेस्टीजवळ नांदलापूर बाजूकडून वेगात आलेल्या मोटारसायकलने (एमएच-11- एएन-9671) अक्षयला जोराची धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला, छातीला जोरात मार त्याला तातडीने कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा काल मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारसायकलस्वार अंकुश तुकाराम कारंडे (रा. मलकापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अक्षय हा येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत होता. शेवटचा पेपर देऊन घरी जाताना त्याचा अपघात झाला. अक्षय हा शिर्के कुटुंबीयाचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मुत्यूमुळे शिर्के कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत. हवालदार खलील इनामदार तपास करत आहेत.