हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जुने शिवसैनिक नारायण राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या क्षणी आपण त्यांना भेटू शकलो नाही याच दुःख आजही मनात कायम आहे असं सांगतानाच साहेब मला क्षमा करा, मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही असं म्हणत राणेंनी दुःख व्यक्त केलं. नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या प्रति असलेल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
काय म्हणाले नारायण राणे-
आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे. साहेब, आपल्या शेवटच्या दिवसांत मला आपल्याला भेटता आलं नाही याची मला आयुष्यभर खंत राहणार आहे.
साहेब अतिशय दयाळू स्वभावाचे होते. ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपलं माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपलं. आपल्या तीक्ष्ण बुद्धीनं आणि परोपकारी स्वभावामुळे त्यांना समाजाच्या सगळ्या थरांमधून मित्र आणि अनुयायी लाभले होते. १९६६ मध्ये मराठी माणसाची एकमेव आशा म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतर त्यांनी कडव्या हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला. त्यामुळेच मराठी माणूस आणि माझ्यासारखे तरूण त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित झाले होते. पक्ष चालवताना आपल्या पक्षाच्या माणसांवर ते प्रेमाचा जो वर्षाव करीत आणि जो विश्वास दाखवीत, त्यामुळे ती माणसं त्यांच्यासाठी जिवावर उदार व्हायलाही मागेपुढे पहात नसत. ते आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेत आले होते. दुःखाच्या प्रसंगी ते विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या पक्षाचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते.
आदरणीय साहेबांच्या जन्म दिनानिमित्त
गुरुस्मरण pic.twitter.com/DIR7ZmkoIq— Narayan Rane (@MeNarayanRane) January 23, 2023
मला स्वतःला साहेबांचं खूप प्रेम मिळालं. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला होता. मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे आहे हे कबूल करण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या राजकीय यशात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. ‘माणसानं विचारानं श्रीमंत असावं आणि ही श्रीमंती त्यानं वाटत राहिली पाहिजे’ हा त्यांचा विचार माझी नेहमी पाठराखण करत राहील. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असा माझा जो अविश्वसनीय प्रवास झाला आहे तो केवळ साहेबांच्यामुळेच शक्य झाला आहे. त्यांनी आपला भक्कम पाठिंबा दिला.
आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही.
साहेब, तुम्ही माझ्या आई-वडिलांपेक्षा जास्त प्रेम मला दिलंत. सेना सोडून बाहेर पडल्यावरदेखील तुम्ही मला दोनदा फोन केलेत. तुमच्या हृदयाच्या मोठेपणाचा आणखी कोणता पुरावा द्यावा ? त्यांची प्रकृती बरी नसताना मला त्यांना भेटायचं होतं. ते करता येत नसल्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा ! असं म्हणत नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं आहे.