इरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह

जीना इसी का नाम हैं | नमस्कार. नसिरुद्दीन शाह यांनी गेल्या रविवारच्या म्हणजेच 3 मे 2020 रोजीच्या इंडियन एक्सप्रेसच्या ‘EYE’ या पुरवणीत इरफान खान विषयी लिहिलेला एक इंग्रजी लेख प्रकाशित झाला. अभिनय करणाऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच तो महत्वाचा आहे. त्याचे मराठी वाचकांसाठी कृतार्थ शेवगावकर यांनी केलेलं भाषांतर. आयुष्याविषयी खूप काही सांगून जाणारा लेख आहे. नक्की वाचा. नसिरुद्दीन शाह आणि इंडियन एक्सप्रेस यांचे मनापासून आभार.

इरफानच्या जाण्याचा अर्थ माझ्यासाठी काय आहे हे शब्दात बांधणे खरोखर अवघड आहे. त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी माझा जवळचा संबंध नव्हता, परंतु मला हेवा वाटायचा असा तो अभिनेता होता. इरफानसारखा अभिनेता होण्यासाठी किती प्रदीर्घ आणि कठीण संघर्ष करायला लागतो याची सर्वांनाच कल्पना नाही. तो नावारूपाला येण्यापूर्वी त्याने टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये असंख्य छोटया मोठ्या भूमिका केल्या असतील. त्याच्यासारख्या माणसाची खासियत हीच असते की कितीतरी वर्षे नकारघंटा ऐकूनही तो थकत नाही आणि त्याच्या मनातील स्वतःवरील विश्वास कमी होत नाही.

मुंबईत स्ट्रगलसाठी आलेल्या नटांना जेव्हा मी भेटतो तेव्हा ते मला सांगतात की ‘मी दोन वर्षे इथे प्रयत्न करेन अन्यथा गावी परत जाईन.’ तेव्हा मी त्यांना ‘तुम्ही तुमची दोन वर्षे वाया न घालवता लगेचच गावी जा.’ असा सल्ला देतो. दोन वर्षात काहीच होणार नाहीये. इरफानने स्वतःला अशी कोणतीही मर्यादा (डेडलाईन) दिली नव्हती. हाच आपला आयुष्यभराचा उद्योग आहे हे त्याला ठाऊक होते. इथे तग धरण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्याचा पहिला सिनेमा ‘द वॉरियर’ (2001) येण्याआधी कित्येक वर्षे तो कसाबसा इथे तग धरून कष्ट करत राहिला. लगोलग यश न मिळणाऱ्या आजच्या तरुण नटांसाठी हे खरोखर प्रेरणादायी उदाहरण आहे.

मला नेहमी जाणवतं की मृत्यू हा जगण्याचा सर्वात कमी महत्वाचा भाग आहे. माझा या गोष्टीवर विश्वासच आहे. तुम्ही कधी आणि कसे मरता याने फारसा फरक पडत नाही. तुम्ही कसे जगला आणि जगत असताना तुम्ही काय केले हे जास्त महत्वाचे. इरफानने त्याच्या जगण्याचा पुरेपूर उपयोग केला. आज मला माझ्या विश्वासाचा पुनर्विचार करायला लागतोय. इरफानच्या जाण्याची वेळ आणि कारण दोन्हींनी खूपच फरक पडलाय. त्याच्याकडे देण्यासाठी अजून खूप काही होतं. आपण पाहिलेलं इरफानचं काम म्हणजे त्याच्या अफाट प्रतिभेची आणि बांधिलकीची केवळ एक चुणूक होती. त्याची न दिसलेली प्रतिभा पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबात नाही. समोर येऊन उभ्या ठाकलेल्या अवघड परिस्थितीला माणूस कसा भिडू शकतो हे पाहायचे असल्यास इरफानकडे पहावे. तो केवळ एक प्रतिभावान अभिनेता नव्हता. तो ज्या पद्धतीने जीवनाकडे पाहायचा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायचा आणि ज्या कृतज्ञतेने तो शेवटची काही वर्षे जगला ते खरोखर विस्मयचकित करणारे आहे. त्याच्यामध्ये दुरदुरपर्यत अहंभाव नव्हता. त्याला होत असणाऱ्या वेदना त्याने कधी व्यक्त केल्या नाहीत. “हे नाजूक शरीर इतक्या प्रचंड वेदना सहन करू शकते हे आश्चर्यजनक आहे.” एवढंच तो म्हणायचा. त्याचे बोलणे ऐकताना तो स्वतः या दुःखातून जातोय हे जाणवायचेही नाही. शेवटपर्यंत तो लोकांना प्रेरणा देत राहिला. ज्याप्रकारे तो या भयंकर आजाराशी लढला, सतत आशावादी राहिला आणि ज्या वस्तूनिष्ठ दृष्टिकोनातून त्याने परिस्थिती हाताळली हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. जेव्हा त्याच्या आजाराचे निदान झाले तेव्हा त्याच्या शांततेचा भंग केलेला त्याला आवडेल की नाही याची मला कल्पना नव्हती, म्हणून मी त्याला संपर्क केला नाही. पण इरफाननेच एक दिवस मेसेज पाठवला. “Knock Knock Naseer Bhai”. नंतर लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना अनेकदा मी त्याच्याशी बोललो. एक अपरिहार्य गोष्ट रोज आपल्या दिशेने पावलं टाकतेय हे त्याला ठाऊक होते. तरीही तो म्हणायचा की “किती लोकांना स्वतःचा मृत्यू असा जवळजवळ येतांना त्याचे निरीक्षण करण्याची संधी मिळते? मी ही जवळ येणारी गोष्ट पाहू शकतो आणि तिचे स्वागतही करू शकतो.” त्याचे हे शब्द ऐकल्यावर मी हललो. मला जाणीव झाली की एखाद्यासाठी मृत्यूला सामोरं जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

इरफानचे काम सर्वांना माहित आहे आणि ते नेहमीच आपल्या सोबत असणार आहे. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होईल यात काहीच शंका नाही. तुम्ही त्याचा अभिनय पाहता तेव्हा जणू वाटतं की तुम्ही त्याचं मन वाचताय. तो तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी कधीच कष्ट घेत नाही. एक अभिनेता म्हणून इरफानच्या बाबतीत हा मोठा विरोधाभास होता. अभिनेता नेहमीच त्याच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी कष्ट घेत असतो. इरफानला विश्वास होता की प्रेक्षक त्याच्यापर्यंत पोहचणार आहेत. जे लोक फक्त त्याचे काम पाहून त्याच्याशी जोडलेले होते त्यांनाही तो आपलासा वाटला. एखाद्या अभिनेत्यासाठी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. प्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसांत शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वानाच दुःख झालंय. ओळख नसली तरी हा माणूस हिरा होता हे सर्वांनाच जाणवलं होतं. त्याच्या अभिनयकलेवरील प्रभुत्वाचे आणि स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासाचेच हे द्योतक आहे. ते प्रभुत्व आणि क्षमता त्याने कमावलेल्या होत्या. त्याची बुद्धिमत्ता दुर्मिळ होती. त्याने केलेल्या भूमिकांमध्ये एक चमत्कारिक दैवी सामर्थ्य होते. बुद्धिस्ट साधू वेगवेगळया रंगातून अतिशय अवघड अशी चित्र काढतात. त्यासाठी अनेक दिवसांची तपश्चर्या लागते. चित्र पूर्ण झाले की ते लगोलग ते चित्र पुसून टाकतात. ते कोणी पाहीले किंवा नाही याने फारसा फरक पडत नाही. परंतु ती कलाकृती घडवण्यासाठी ते सर्वस्व पणाला लावतात. इरफानचा अभिनय पाहिला की मला या लोकांची आठवण येते. इरफान कधीच स्वतःच्या कामाबद्दल बोलायचा किंवा बढाई मारायचा नाही. तो फक्त शांतपणे काम करायचा. अजून काम करण्याची संधी त्याला मिळणार नाही हे सत्य अन्यायकारक वाटून माझा संतापही होतो. आम्ही समकालीन आहोत आणि एक असा अव्वल प्रतिभेचा अभिनेता मला माझ्या काळात पाहायला मिळाला याबद्दल मला कृतज्ञता वाटते.

गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘जझिरे’ (1991) नावाच्या टेलिफिल्ममध्ये तो, रत्ना पाठक-शाह आणि मिता वशिष्ठसोबत काम करत होता, तेव्हा मी प्रथम त्याला भेटलो. हेंरीक इब्सेनच्या Little Eylof या नाटकावर ती टेलीफिल्म होती. मी ते नाटक वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला ते अतिशय अस्पष्ट, गूढ आणि दुर्बोध वाटले होते. इरफान तेव्हा अनेकदा तालिमीसाठी घरी यायचा. तेव्हा पहिल्यांदा हा उंच, हडकुळा आणि मोठ्ठया डोळ्यांचा माणूस माझ्या दृष्टीस पडला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (NSD) मी शिकवायला जायचो परंतु त्याच्या वर्गासोबत काम करण्याची संधी कधी मला मिळाली नाही. नंतर मी ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह: टू प्लस टू प्लस वन'(1997) नावाच्या एका सिनेमात काम केले. त्यात त्याची अतिशय छोटी भूमिका होती, परंतु त्याच्या कामाच्या अस्सलतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही. कोणतीही खटपट आणि विशेष प्रयत्न न करता त्या सिनेमात तो उभा राहिला. ‘द वॉरियर’ पाहिला तेव्हा मी इंग्लंडमध्ये होतो. तो पाहून मी पूर्णतः हललो आणि न राहवून त्याला फोन केला. त्याला खूप आनंद झाला. भारतात अनेकांनी ही फिल्म पाहिलेली नाही.

विशाल भारद्वाजच्या मकबूल (2003) पासून आमची अजून चांगली ओळख झाली. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये अनेकदा अदलबदल चालले होते. विशालला काहीतरी जाणवले आणि त्या भूमिकेसाठी त्याने इरफानला निवडले. इरफानच्या भारतातील ओळखीसाठी मकबूल सुरवात होती. तो तेव्हा अवघ्या तिशीत होता आणि सोबत ओम पुरी, पंकज कपूर आणि मी होतो. त्या सिनेमात तो स्वतंत्र उभा राहिला.

मी त्याला अभिनय करताना पाहतो तेव्हा मला मोझार्ट आणि अंटेनियो सॅलेरी आठवतो. सॅलेरी देवाला विचारतो की “तू मला इतकं सामान्य का बनवलंस? या मोझार्टने नुसत्या बसल्याबसल्या सहज केलेल्या काहीबाही संगीतरचना मी तासनतास कष्ट करून बनवलेल्या संगीतरचनांपेक्षा श्रेष्ठ का आहेत ?” मी इरफानला बघतो तेव्हा मला असेच वाटते. तो मोझार्ट होता.

मी त्याच्या वयाचा होतो तेव्हा त्याच्याइतकं प्रतिभावंत असायला मला नक्कीच आवडलं असतं. मी खरोखर निखालस त्याचा मोठेपणा मान्य करतो. इरफानच्या सोबतीने त्याच्या बाजूला उभा राहील असा कोणताही अभिनेता मला दिसत नाही. तो केवळ उत्कृष्ठ अभिनेता नव्हता तर त्याचसोबत एक सज्जन,प्रेमळ आणि निस्वार्थी माणूस होता. त्याच्यासोबत घालवलेले मौल्यवान क्षण मी जपून ठेवले आहेत. मी स्वतःला इरफानचा प्रवास पाहिलेल्या भाग्यवान लोकांपैकी एक समजतो.

अभिनयाचे एक मोठे शिक्षक एकदा म्हणाले होते की प्रतिभा नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, परंतु प्रतिभेचा अभाव मात्र नक्कीच असतो. तुम्ही योग्य वेळी योग्य जागी नसता तेव्हा प्रतिभेचा अभाव असतो. मी इतकंच म्हणेन की इरफान सुरवातीपासून योग्य वेळी योग्य ठिकाणी होता आणि त्याने ही गोष्ट ओळखली होती.त्यामुळे त्याची निराशा किंवा भ्रमनिरास झाला नाही. त्याची जागा कुठंय हे त्याला पक्के ठाऊक होते. ही विशेष प्रतिभा त्याच्याकडे होती आणि ती त्याला दैवयोगाने मिळालेली नव्हती. स्वतःच्या जगण्याच्या अनुभवातून आणि प्रचंड करूणेतुन त्याने ती कमावली होती. इरफानचा अभिनय नैसर्गिक होता असं म्हणणं सोपं आहे, परंतु नैसर्गिक असं काही अस्तित्वात नसतं. मायकल अँजेलोलासुद्धा कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी चित्रांवर तासनतास काम करावे लागायचे. मला खात्री आहे की इरफानसुद्धा भूमिकेवर प्रचंड प्रमाणात मेहनत घेत असणार. चांगला अभिनेता होण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत करायला लागते. स्वतःवर सतत शंका घेत, काहीही गृहीत न धरता परत परत करून बघण्याची धमक लागते. हृदय पिळवटून सतत काम करायला लागते. तेव्हा जाऊन कुठे चांगला अभिनेता तयार होतो. इरफान हिंदी सिनेमाच्या प्रभावाखाली आला नाही हे बरेच झाले. त्याच्यावर त्याच्या स्वतः चा प्रभाव होता. इरफान कधी त्याच्या कामामध्ये हललाय असं मला कधीच जाणवलं नाही. याला काही अपवाद आहेत. लाईफ ऑफ पाय (2012) च्या काही सीन्समध्ये त्याने अमेरिकन-कॅनेडियन लहेजामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलाय. ते त्याला फारसं जमलेलं नाही. मी त्याविषयी त्याला बोललो तेव्हा त्याने ते कबूल केले.”मै ट्राय कर रहा था, नसिरभाई।” तो म्हणाला.

यावरून मकबुलच्या चित्रीकरणादरम्यानचा एक प्रसंग मला आठवतोय. चित्रपटात मकबूल आणि काका यांच्यात एक प्रसंग आहे. काकांची भूमिका पियुष मिश्रा करत होता. मॅकबेथला बँकोच्या भुताशी संघर्ष करायला लागतो असा लोकप्रिय शेक्सपिअरियन सीन होता. काकांचे शव जेव्हा चितेवर आणले जाते तेव्हा इरफान दुःख दाखवण्यासाठी गुडघे टेकतो आणि अचानक चितेवरील काकांच्या मृतदेहाचे डोळे उघडतात. आम्ही तालीम करत होतो. पियुष चितेवर आडवा झाला होता, इरफान त्याच्या बाजूला बसला होता आणि मी त्याच्या मागे उभा होतो. तालीम सुरू झालीय याची मला काही कल्पनाच नाही. मी तसाच उभा होतो. इरफान जोरात मागे कोसळला. मी त्याला आधार द्यायला धावलो. मला वाटलं त्याचा तोल जातोय. तर – इसमत चुगतई सदाअत हसन मंटोच्या डोळ्यांचं वर्णन करते तसं – ते ‘मोरपंखी’ डोळे माझ्याकडे वळून मला म्हणाले, “नसिरभाई मी अभिनय करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही का मला मदत करताय?” एखादा अभिनेता अभिनय करतोय आणि मला ते खरं वाटलंय हे याआधी कधी झालेलं नाही. ज्या तन्मयतेने तो भावनिक उद्रेक, क्रोध आणि उत्कटता असलेल्या प्रसंगांना भिडायचा तेव्हा तेव्हा तो नेहमीच विस्मयचकित करायचा.

मी त्याला रंगमंचावर कधीच पाहिले नाही. त्याविषयी बोलण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण त्याने कधी इच्छा दाखवली नाही. तो थेटरला यायचा. माझे रंगमंचावरील काम पाहायचा. पण त्यात त्याने कधी सहभाग घेतला नाही. कदाचित रॉबर्ट डी निरो किंवा डॅनियल डे लुईस प्रमाणे इरफान त्याच्या भूमिकांमध्ये प्रचंड प्रमाणात भावनिक गुंतवणूक करायचा असं मला जाणवतंय. रोज रात्री त्या प्रमाणात स्वतःच्या मनाची गुंतवणूक करून घेणे शक्य नसते. म्हणून त्याने नाटक सोडले असावे असे माझे गृहीतक आहे. याच कारणासाठी मार्लन ब्रँडो आणि डॅनियल लुईस सारख्या अभिनेत्यांनी नाटक सोडले. यश मिळालं म्हणून नव्हे तर रंगमंच त्यांच्याकडून जी मागणी करत होता ती पूर्ण करणे त्यांना अशक्यप्राय होते म्हणून.

‘यु होता तो क्या होता’ (2006) या मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची मला लाज वाटते. इरफानचा त्या सिनेमातील भाग अनेक कारणांसाठी अतिशय निर्दयीपणे कापायला लागला. इतका की शेवटी त्याचं सिनेमात काही उरलंच नाही. त्याने एकदाही तक्रार केली नाही किंवा मी त्याच्यावर अन्याय केलाय अशी जाणीव होऊ दिली नाही. तो त्याविषयी केवळ आपुलकीने बोलला. भूमिका कोणती किंवा किती पैसे मिळणार असा एकही प्रश्न न विचारता त्याने केवळ माझ्या एका बोलण्यावर होकार कळवला होता. मला पश्चाताप होतोय की मला त्याची भरपाई करायची संधी मिळाली नाही. आता त्या मोठ्या अभ्यासखोलीत भेटायची संधी आम्हाला कधी मिळालीच तर मी ती भरपाई करू शकेल.

इरफानची कथा सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत प्रेरणादायी आहे. त्याने आपल्याला दिलेल्या क्षणांसाठी मी केवळ फैज अहमद फैजची एक ओळ सांगू शकतो.

“उन असीरों के नाम
जिन के सीनों में फ़र्दा के शबताब गौहर
जेलख़ानों की शोरीदा रातों की सर-सर में
जल-जल के अंजुम-नुमाँ हो गये हैं |
(त्या बंदिवानांच्या नावे – ज्यांच्या उरात उद्याचे चमकणारे मोती आहेत – परंतु कारागृहाच्या उद्विग्न रात्रींच्या तुफानी वावटळीत जळून जळून जणू ते तारे होऊन गेले आहेत ; भाषांतर: – नचिकेत देवस्थळी)

इरफान मागे ठेऊन गेलेला वारसा म्हणजे या ताऱ्यांचे नक्षत्र आहे. नटांनी आदर्श आणि प्रेरणा घ्यावी असे हे नक्षत्र आहे. इरफान खरोखर अभिनेत्यांचा अभिनेता आहे.

लेखक : नसिरुद्दीन शाह
इंग्रजी संपादन : अलका साहनी
मराठी भाषांतर : कृतार्थ शेवगावकर

मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी – Naseeruddin Shah writes on Irrfan Khan: ‘Irrfan’s legacy is like a constellation of stars for every actor to take inspiration from’ – https://indianexpress.com/article/express-sunday-eye/naseeruddin-shah-irrfan-khan-death-6390360/

You might also like