औरंगाबाद | जिल्ह्यातील पैठण तालुक्यात नाथषष्ठी निमित्ताने भाविक व वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता पैठण शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट व कोरोना तपासणी केंद्र प्रशासनाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. शहरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून लक्षणे असल्यास अँटिजेन चाचणीही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.
नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली, तरी दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पैठण शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे. पैठण शहरात येणाऱ्या पैठण-शेवगाव रोडवर गोलनाका परिसर, पैठण-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल सह्याद्रीजवळ व शहरातील गागाभट्ट चौकात असे तीन कोरोना तपासणी केंद्र नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी उभारण्यात आले.
या ठिकाणी पैठण शहरात येणाऱ्या भाविकांची व वारकऱ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासणी शरीरातील ऑक्सिजन लेव्हल सुध्दा घेण्यात येणार आहे. यात लक्षणे आढळून आलेल्या भाविकांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या वतीने नाथमंदीर व यात्रा मैदान परिसर उद्यापासून सँनिटाईझ करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले. दरम्यान आज नाथमंदिर परिसर, गोदाकाठातील निर्याण दिंडी मार्ग, गागाभट्ट परिसर, पालखी ओटा व आतील नाथ मंदीर परिसराची स्वच्छता नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आली.
पोलिसांचे पथसंचलन…
गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावाड व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या उपस्थितीत आज पोलीस दलाचे शहरातून संचलन करण्यात आले.
तगडा पोलीस बंदोबस्त...
नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविक व वारकरी दर्शनासाठी येणार हे गृहीत धरून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले. यावेळी २० वरिष्ठ पोलीस अधिकारी, आरसीपी पथक, व जवळपास ३०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे.
दोन चेक पोस्ट…
पैठण व अहमदनगर जिल्हा हद्दीवर बलदवा फार्म हाऊसजवळ व पैठण-औरंगाबाद रस्त्यावर सह्याद्री चौकात असे दोन ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.