दुर्दैवी ! इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून नवी मुंबईत बालकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एका 13 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना हा अपघात झाला. हि दुर्दैवी घटना नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये घडली आहे. ईशान गुप्ता असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे 13 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत ईशान गुप्ता हा नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील महाराणी सोसायटीत राहत होता.

जम्पिंग मशिनवर एकट्याचा खेळ
घटनेच्या दिवशी रात्री ईशान हा आपल्या इमारतीच्या टेरेसवर खेळण्यासाठी गेला होता. यावेळी टेरेसवर इमारतीतील दोघेजण वॉकिंग करत होते. तर ईशान हा टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशिनवर एकटाच खेळत होता. यावेळी ईशान याने जम्पिंग मशिनवरुन उडी घेतली मात्र त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने तो टेरेस वरुन खाली पडला. यानंतर त्याला तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.