राणांची खासदारकी बच्चूभाऊंमुळे ‘कडू ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय. थांबणे हा आमचा मूळ स्वभाव नाही. सभेचं ठिकाण आम्ही बूक केलं होतं. आम्ही तोंड उघडले तर अनेकांची अडचण होईल. हिंदू मुस्लीम दंगल होईल ही आम्हाला भिती होती. निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहे. महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्ता असल्याने कायदा यांच्या हातात आहे… बच्चू कडू आणि पोलिसांच्यात काल सभेला दिलेली परवानगी नाकारल्यानं झालेल्या राड्यानंतर बच्चू भाऊंनी दिलेली ही स्फोटक प्रतिक्रिया… बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील जुन्या वादाची किनार पुऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.. शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंना साथ देणाऱ्या बच्चू कडूंवर याच रवी राणांनी महायुतीत असतानाही खोके घेतल्याचा आरोप केला होता…तेव्हा राणा आणि कडू यांच्यातील घासाघासीमुळे शिंदे आणि फडणवीस चांगलेच अडचणीत सापडले होते. शेवटी दोघांच्यातील टोकाचा विरोध मावळला. पण त्याने पुन्हा डोकं वर काढलं ते अमरावती लोकसभेच्या निमित्तानं…2019 ला राष्ट्रवादीच्या सपोर्टवर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना धूळ चारत राणा अपक्ष खासदार झाल्या. मात्र त्यानंतर हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांचा कल भाजपकडे झुकला. याचच फळ म्हणून त्यांना कमळाच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर झाली…पण आधीच रवी राणांसोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळे बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेत प्रहारकडून दिनेशभाऊ बुब यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं…थोडक्यात काय तर युतीधर्म मोडून त्यांनी राणांविरोधात म्हणजेच एक प्रकारे भाजप विरोधातच दंड थोपटलं… पण राणांसाठी थेट गृहमंत्री अमरावतीत सभा घेत असल्यानं बच्चू कडूंची आधीच प्रशासनाकडून कन्फर्म झालेल्या सभेला पोलिसांनी रेड सिग्नल दिला…

आता असं काही झालं तर शांत बसतील तर ते बच्चुभाऊ कुठले..पोलिसांनी अडवणूक केल्यावर खटका उडाला… बच्चुभाऊंच्या तळपायातील आग मस्तकात गेली…राडा झाला… आणि थंड झालेल्या राणा आणि कडू यांच्यातल्या जुन्या वादाची नव्यानं खपली निघाली… सांगायचा मुद्दा असा की, बच्चूभाऊंना डिवचून भाजपनं नवनीत राणांची खासदारकी कशी धोक्यात आणलीय? बच्चुभाऊ राणांना पाडण्यासाठी या घटनेनंतर कसा काट्याचा संघर्ष करू शकतात? कालच्या घटनेचे पडसाद अमरावतीच्या राजकारणात कसे पडतील? तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने नवनीत राणा यांना तिकिट देऊ केलं. राणांच्या या उमेदवारीला भाजपांतर्गत मोठा विरोध होता. अमरावतीच्या स्थानिक भाजप नेत्यांना फारसं विश्वासात न घेता रानांच्या उमेदवारीवर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्यानं राणांचं काम करणार नाही, असा पवित्रा अनेक भाजप नेत्यांनी घेतला…पण यात उडी घेतली ती प्रहारने…ठाकरे गटाते नेते दिनेश बुब यांना गळाला लावून बच्चू कडूंनी त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून भाजपच्या शिट्ट्या गुल केल्या…शिवसेनेमध्ये माझी उमेदवारी आधीच जाहीर केली होती. मात्र ती मला मिळाली नाही. लोकांचं आग्रह होता की मी प्रहार मध्ये उभं राहावं, त्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे दिनेश बुब यांनी सांगितलं. त्यामुळे अमरावतीची निवडणूक काट्याची बनून नेमकं कोण जिंकेल? हे सहजासहजी सांगणं अवघड बनलं होतं…

प्रहार भाजपच्या नवनीत राणांना पाडण्यासाठी मोठा डाव टाकतंय | Bacchu Kadu On Navneet Rana

राणा यांना कडवा विरोध असल्यामुळेच बच्चुभाऊंनी तिसरा उमेदवार देऊन मैदान जड केलं होतं हे तर कन्फर्म होतं. पण राणा विरुद्ध कडू असा संघर्ष जिल्ह्यात फारसा पाहायला मिळत नव्हता. पण काल सभेच्या जागेवरून ठिणगी पडली… आणि पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू आमने सामने आले… संयम ठेवून राजकारण करणाऱ्या बच्चूभाऊंचा पहिल्यांदा पारा चढला.. आरोप प्रत्यारोप सुरू झालेत…आव्हान दिली जातायत.. हे सगळं फायनली दाखवून देतायत की बच्चुभाऊ आता आपला इंगा दाखवून राणांना काहीही झालं तरी पाडणार याची… भाजपच्या राणांना पाडण्याची एवढी मोठी रिस्क बच्चुभाऊ घेत असतील तर त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत…

त्यातलं पहिलं कारण म्हणजे सभेच्या राड्यामुळे प्रतिष्ठेची झालेली निवडणूक…

भाजपची खूप मोठी ताकद आणि घटक पक्षांचा सपोर्ट असल्याने ही लढत प्रहारचा उमेदवार असला तरी काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दुहेरी लढत होईल, असा सगळ्यांचा अंदाज होता. पण दिनेश बुब यांच्या उमेदवारीला मिळणारा प्रतिसाद पाहता भाजप थोडीशी धास्तावली म्हणूनच फडणवीस, पवार ते अमित शहापर्यंत सर्वांच्या सभांचा धडाका अमरावतीत चालू आहे. काहीही करून ही जागा पडता कामा नये, यासाठी भाजप ॲक्टिव्ह झालीय. त्यातूनच बच्चुभाऊंची नियोजित आणि प्रशासनाने मान्यता दिलेली सभा गृहमंत्र्यांच्या सभेचं कारण देत रद्द करण्यात आली. कडूंनी हरेक प्रकारे प्रयत्न करून पाहिले पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही…

हे सगळं अर्थातच बच्चू भाऊंच्या आक्रमक राजकारणाला नख लावणारी घटना होती. त्यामुळे कडू यांनी डायरेक्ट मुळालाच हात घातला…मला अजूनही भिती आहे की, २६ तारखेला किंवा उद्या-परवा हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते, अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. भाजपाची ही संस्कृती नाही. पण युवा स्वाभिमान पक्ष भाजपाला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे… थोडक्यात जुन्या रवी राणा वादाची खपली त्यांना काढायची होती अन् ती त्यांनी काढलीसुद्धा… पण या घटनेमुळ प्रहारची इमेज ढासळली आहे. अमरावतीत आणि महायुतीतही बच्चुभाऊंचं काहीच चालत नाही, असा इनडायरेक्ट मेसेज या घटनेतून गेला…थोडक्यात राणा यांनी केलेल्या या पॉलिटिकल डॅमेजला आता दिनेश बुब यांना निवडून आणणं, हेच बच्चुभाऊंसाठी करेक्ट उत्तर असणार आहे. या संघर्षात बच्चुभाऊ आपली राजकीय ताकद वापरत राणा यांना येत्या काळात कसा कडू ढोस पाजतील?, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

दुसरी गोष्ट येते ती म्हणजे समांतर राजकारणात प्रहारला जिवंत ठेवण्याची…

सबका भिडू बच्चू कडू.. ही टॅगलाइन पुऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. याचं कारण म्हणजे बच्चु भाऊ…आंदोलन, मोर्चे आणि विधानसभेतील त्यांची भाषण म्हणजे डायरेक्ट खटक्यावर बोट असतात… अपंगांसाठी त्यांनी केलेला कामाचं कौतुक आजही होत असतं.. यामुळेच बच्चुभाऊंची स्वतःची अशी एक महाराष्ट्रात आगळी वेगळी इमेज बिल्डिंग झाली… मविआ सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदही मिळालं…प्रहार तोपर्यंत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पसरत होती…पक्ष संघटना वाढत होती…पण याला खीळ बसली ती शिंदेंच्या बंडाने… शिवसेनेच्या बंडात ज्या काही अपक्ष आमदारांचा समावेश होता, त्यात बच्चू कडू देखील होते… पण हा निर्णय प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि भाऊंना मानणाऱ्या सामान्य नागरिकांना काही पटला नाही… दिव्यांग मंत्रालयासाठी हे सगळं केल्याचं त्यांनी क्लिअर केलं, पण मंत्रीपदही मिळालं नाही… या सगळ्याचा परिणाम म्हणजे कडू दुखावले गेले आणि त्यांच्या राजकीय इमेजलाही धक्का पोहचला… त्यात बच्चू भाऊंना भिडण्याच्या आधी भलेभले राजकारणीही दहा वेळा विचार करताना रवी राणांसारख्या आमदारानं कडूंवर खोके घेतल्याचा आरोप करत डिवचलं पण राणा युतीचा भाग असल्याने कडूंचं काही ऐक चाललं नाही. याउलट या दोघांची भांडण मिटवण्यासाठी फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली…

एकूणच प्रहारची समांतर राजकारणात हार होऊ नये, हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील ताकद दाखवून द्यायची असेल तर खासदारकीचं मैदान मारणं बच्चू भाऊंसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण कडू इथून कशी फाईट देतायेत? यावर त्यांना विधानसभेला किती जागा सुटणार? याच गणित अवलंबून असणार आहे…थोडक्यात राजकीय अपरिहार्यता म्हणून राणा यांना पाडणं हे प्रहारला राजकारणात जिवंत ठेवणारं आहे. त्यामुळे कडू राणा यांना कडवं आव्हान देतील, याबद्दल सध्यातरी कोणताही डाऊट नाही.

यातला शेवटचा मुद्दा येतो तो रवी राणा यांचं वर्चस्वाचा राजकारण संपत जिल्ह्यात दबदबा निर्माण करणं…

बच्चू कडू हे मंत्री असताना अमरावतीत मोठी हिंसक दंगल झाली तेव्हा त्यांनी एकाही हिंदूंच्या घरी भेट दिली नाही. उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा देखील त्यांनी भेट दिली नाही. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी मातोश्रीवरुन पैसे घेत कडू यांनी सुपारी घेतलीय… हा व्हिडिओ शूट होत असताना रवी राणा यांनी केलेले हे खळबळजनक आरोप. याआधीही रवी राणा यांनी बच्चू कडूंवर आरोपांची एक मालिकाच चालवलीय. या सगळ्या संघर्षाची मूळ दिसतात ती अमरावती जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणात…जिल्ह्याच्या राजकारणातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर काँग्रेसचे तीन आमदार, प्रहाराचे दोन तर एकमेव अपक्ष म्हणून रवी राणा निवडून आले आहेत… त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात प्रहारची कागदावर पोस्ट ताकद दिसत असतानाही भाजपनं राणांना सपोर्ट केल्यानं आता लोकसभेच्या निमित्तानं जिल्ह्याच्या राजकारणातील आपला दबदबा कायम ठेवण्याची संधी लोकसभेच्या निमित्तानं बच्चुभाऊंना चालून आली आहे… एवढेच नाही तर यातून इनडायरेक्ट रवी राणा यांच्याही राजकारणावर फुली मारली जाणार असल्यानं एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासाठी कडू दिनेश बुब यांना काहीही करून निवडून आणतील, असे एकंदरीत अमरावतीचं चित्र दिसतंय…

या सगळ्याची एकूणच बॉटम लाईन काय तर, राणांची खासदारकी बच्चूभाऊंमुळे ‘कडू’ झालीय एवढं मात्र नक्की… अमरावतीत नेमकं काय घडेल? काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना मविआ खासदार बनण्या इतकी ताकद देतील काय? रवी राणा कमळाच्या मदतीनं पुन्हा एकदा खासदार होतील की दिनेश बुब प्रहारचे पहिले वहिले खासदार होऊन दिल्लीचे दरवाजे ठोठावतील? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद…