काय सांगता ! हळदीच्या अंगावरच नवरदेवाने गाठले पोलीस ठाणे

औरंगाबाद – लग्नाचा दिवस हा प्रत्येकाच्या जिवनातील एक अविस्मरणीय अनुभव असतो. तसेच लग्न म्हटली की धमाल, मौज मजा असते. मित्र मंडळी, नातेवाईकांसाठी तो एक आठवणींचा व आनंदाचा जणू एक प्रकारे उत्सव असतो. मात्र, वैजापूर शहरात बुधवारी आयोजित लग्न समारंभात नवरदेव व त्यांच्या नातेवाईकांना वेगळाच अनुभव आला. नवरीच्या आई वडीलांनी चक्क नवरीला मुलीला घराबाहेरच पडू न दिल्याने नवरदेवाला हळदीच्या अंगाने पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्री उशिरापर्यंत यावर काही तोडगा निघाला नव्हता.

वैजापूर तालुक्यातील तिडी येथील एक युवक हा वैजापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याचे त्याच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या युवतींशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधातून त्यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केला. दोघेही घराबाहेर पळून गेले. तसेच त्यांनी रितसर विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केला. तो पर्यंत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात केली. मात्र दोघेही सज्ञान असल्याने नातेवाईक काही करू शकले नाही. मात्र मुला मुलींनी पळून जाऊन लग्न केल्याची खंत आई वडिलांना होतीच. आपली समाजात बदनामी होईल. म्हणून त्यांनी समेट घडवून आणला. दोघांचेही रितसर नातेवाईकांच्या उपस्थित लग्न लावण्याचा निर्णय दोन्ही बाजूकडून घेण्यात आला. बुधवारी लग्नाची तारीख ठरली. दोन्ही कुटुंबियांनी सर्व नातेवाईकांना आमंत्रण देऊन लग्नाला बोलाविले. वैजापूर येथे भावी वधूच्या घरी विवाह सोहळा आयोजीत होता. सकाळपासूनच दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांची धावपळ सुरू होती. मित्र, सगे सोयरे, मामा, मावशी, भेटवस्तू सह लग्नाला हजर झाली. मंडप तसेच जेवणाचीही जोरदार तयारी विवाह स्थळी वधु पित्याने केली होती. सकाळपासूनच विवाह स्थळी हजर होणाऱ्यांचे आदरतिथ्य सुरू होते. आलेल्या पाहुण्यांची जेवणाची सोय विवाह स्थळी होती. त्यामुळे ११ वाजेपासून वर-वधू कडील मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होती.

नवरदेवालाही हळद लावून सजवण्यात आले होते. वरात मिरवून आणल्यानंतर तो ही आपल्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत होता. प्रेमविवाह झाल्यानंतर आपले आई वडीलासह सासू सासऱ्यांनी लग्नाला परवानगी देत स्विकारल्याने त्याच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता. बोहल्यावर चढण्यासाठी तो सज्ज असतानाच भलतेच घडले. मुलीच्या आई वडीलांनी चक्क मुलीला डांबून ठेवत लग्नास नकार दिला. त्यामुळे हळद लावून बसलेल्या भावी नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. आपण फसलो गेल्याचे नवरदेव व नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर हळदीच्या अंगावरच नवरदेवाने नातेवाईकासह पोलीस ठाणे गाठले. रात्री उशीरापर्यंत वऱ्हाडी मंडळींनी वैजापूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.मात्र पोलीसांनी हात झटकले. तसेच मुलीच्या आई वडीलांनी मुलीला घराबाहेरच पडू दिले नाही.त्यामुळे काही नातेवाईकांनी घरी काढता पाय घेतला. रात्री उशीरा पर्यंत या विवाहाबाबत तोडगा निघाला नाही.

You might also like