हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील इतर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या चक्री वादळाची पूर्व सूचना संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली होती. त्याचे इतर जहाजांवरील अधिकाऱ्यांनी पालन केले. मात्र, ONGC प्रशासनाने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले नाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ONGC प्रशासनावर कारवाई करुन शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली होती. नवाब यांच्या मागणीनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जहरी टीका केली आहे. “मलिकांचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यांना मानसोपचारतज्ञांची गरज आहे, असे भातखळकर यांनी म्हंटल आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कारवाईची मागणी केल्यानंतर भाजपचे आमदार भातखळकर यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी ते म्हणाले, ” अरबी समुद्रात राष्ट्रीय आपत्ती यंत्रणेने इशारा दिल्यानंतर सुद्धा एक जहाज त्या ठिकाणी कार्यरत होत. आणि कालच केंद्र सरकारने या प्रकारचा तपास करण्याकरिता एक समिती नेमली आहे. त्यामुळे मलिक यांनी विचार करून बोलावे. त्यांनी एखाद्या मानसोपचारतज्ञांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे,” अशा शब्दात भातखळकर यांनी टीका केली आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीवरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांमध्ये आरोप व टीकेचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. एकीकडे कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीवरून भाजपचे नेते, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नितेश राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ONGC या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावरून त्यांच्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही जहरी टीका केली आहे.