कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सध्याच्या काळात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहे. परंतु हेच इंग्रजी माध्यम लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थेची चौकशी करून वेळापत्रकमध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवाज सुतार यांनी निवेदनात म्हंटले आहे की, राज्यात अनेक जागी लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या सकाळी लवकर आहेत. यामुळे मुलांना सकाळी लवकर उठावे लागत आहे, मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मुले आजारपणाचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक शाळा सकाळी इंगजी माध्यम आणि पुन्हा मराठी माध्यम किंवा कॉलेज चालवत आहेत.
एकाच शैक्षणिक इमारती मध्ये वेगवेगळे शिक्षण देत आहे. म्हणून या संस्थेची चौकशी करावी आणि सकाळी लवकर असणाऱ्या लहान मुलांच्या इंगजी माध्यमाच्या शाळा वेळापत्रक मध्ये बदल करून थोड्या उशिरा घेण्यात याव्यात, अशी मागणी सुतार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.