हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई क्रूझ प्रकरणानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. शिवाय या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनीही गौप्यस्फोट करत समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या. . या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समीर वानखेडे सध्या दिल्लीत आहेत. ते एनसीबीच्या मुख्यालयात पोहोचले आहेत. वानखेडे मागच्या दारानं कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची दखल वरिष्ठांकडून घेण्यात आली आहे. त्यांची खाते अंतर्गत चौकशी होणार आहे. खाते अंतर्गत चौकशी सुरू असताना संबंधित अधिकाऱ्याला त्या पदावर राहता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत वानखेडेंना पदावरून दूर करण्यात येईल. याबद्दलचा आदेश पुढील दोन दिवसांत निघेल.
ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंना सुरूवातीपासूनच आरोपांचा सामना करावा लागला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते काल रात्री तातडीने दिल्लीला आले आणि आज एनसीबी कार्यालयात दाखल झाले. याविषयी माध्यमांना त्यांनी विचारणा केली असता, आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही असं उत्तर वानखेडे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता ते तातडीने दिल्लीला का आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे