हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेत तुम्ही मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे असं प्रत्युत्तर दिले आहे .
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेकर किंवा महात्मा फुले यांनी लोकवर्गणीतुन आणि स्वतःचे पैसे खर्च करून शाळा उभारल्या , त्यांनी भीक नाही मागितली. परंतु भीक हा शब्द वापरून चंद्रकांत पाटलांनी या तिन्ही महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सर्व जनतेने चंद्रकांत पाटलांचे विधान गांभीर्याने घ्यावं. चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी काय भीक मागितली हे महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा फक्त निषेध करून चालणार नाही तर यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणाले.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते-
पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी वादग्रस्त विधान केले. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली. त्याकाळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा शाळा उभ्या केल्या. मात्र, लोक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर विसंबून राहतात. त्याकाळात लोक दहा रुपये देणारे होते. आता दहा-दहा कोटी रुपये देणारे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले आहे.