हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ होऊन अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. त्यातच आता पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्यातील राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील एक वजनदार नेता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. यासोबत अनेक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. या नेत्यासाठी काय झाडी काय डोंगर फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीच फिल्डिंग लावल्याच्या चर्चा आहेत. पंढरपूर सोलापूर हा भाग राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आषाढी एकादशीच्या महापूजेला पंढरपुरात आले तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तस झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जाईल.