रत्नागिरी । भाजपने निसर्ग चक्रीवादळानंतर तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सव्याज परतफेड केली. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला आनंद आहे, त्यांचं अभिनंदन, असा उपरोधिक टोला पवारांनी भाजपला हाणला. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या मुद्द्यावरून पाटील यांनी सोमवारी पवारांसह मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत भाजपने आधी सक्रियता दाखवत कोकण दौरा केल्याचे सांगितलं. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
दरम्यान, राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही शरद पवारांनी यावेळी सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”