पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पिंपरी-चिंचवड मनपा चे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. साने यांच्या निधनामुळं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दत्ता साने हे सातत्यानं कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २५ जून रोजी साने यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत होता. तिथं गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही.

मुंबई, ठाणे व पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर देखील करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महापालिका कार्यालयातही करोनानं शिरकाव केला असून येथील ३० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते व कार्यकर्त्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यातील काही जणांनी करोनावर यशस्वीरित्या मातही केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर, भाजपचे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचं निधन झालं आहे. राज्यात याआधी काही नगरसेवकांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

Leave a Comment